सातारा : ‘मराठा समाजाला आरक्षण ही कुठल्याही एका पक्षाची नाही, तर सर्वच पक्षांची सामूहिक जबाबदारी आहे. इतर समाजांप्रमाणेच मराठा समाजानेही तुम्हाला निवडून दिले आहे. त्यांना न्याय द्यावा, अशी अपेक्षा असते. मात्र अन्यायामुळेच नक्षली तयार होतात. नक्षली निर्माण करणारे सत्तेत बसले आहेत,’ अशी टीका खासदार उदयनराजे भोसले यांनी गुरुवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना केली.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर उदयनराजेंनी रान पेटविले आहे. तसेच राज्य शासनाच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करून शासनावर चौफेर टीका सुरू केलेली आहे. गुरुवारीही त्यांनी राज्य शासनावर टीका केली. ते म्हणाले, ‘मराठा कुटुंबात जन्माला आलोय. मराठा म्हणून मी बोलत नाही. त्रयस्थ म्हणून, देशाचा नागरिक म्हणून माझ्या भावना कुटुंबाचा घटक म्हणून व्यक्त करतो. जसा प्रत्येकाला न्याय दिला गेला तसा मराठा समाजाला का नाही? मराठा समाजाच्या मागण्या रास्त आहेत. मागून-मागून त्यांनी काय मागितले? वेळेत नेमणुका मिळाल्या नाहीत तर ४० लोकांनी आत्महत्या केल्या. मग आता किती करतील, काय करतील? याला कोण कसे वळण देईल, हे कोणाच्या हातात आहे का?’
जगात जात हा प्रकार नसता तर निम्म्याच्या वर भांडणं झाली नसती. लोक एकमेकांशी बोलायचे बंद झाले आहेत. प्रत्येक ठिकाणी राजकारण. मुलांनी शिकून कुटुंबाला हातभार लावावा, या अपेक्षा आईवडील ठेवतात. त्यांनी काय करावं? मराठा आरक्षण हा राज्याचा प्रश्न आहे; तर तो केंद्राकडे कशाला ढकलता? तुम्ही काय केलं त्याचं उत्तर द्या ना. तज्ज्ञ म्हणून स्वत:ला संबोधता. मंडल आयोगाच्या वेळी केलं असतं तर त्याचवेळी झालं असतं. आताही टाळाटाळ करत असाल तर परिस्थिती माझ्या हातात राहणार नाही. राज्य शासनाला भांडण लागावं असं वाटत असेल तर आपोआप लागेल. लोक सोडणार नाहीत, उद्रेक होईल. लोकप्रतिनिधी बॉडी गार्ड घेऊन कशाला फिरतात? लोकांसमोर जाऊन सांगावं. नाहीतर त्यांना मूकबधिरांच्या शाळेत नाही तर मेंटल हॉस्पिटलमध्ये टाकून द्यायला पाहिजे. विष पिणार नाही; तर यांना विष पाजणार. त्यांच्यामुळे आमच्यावर अत्याचार होत आहेत, असेही उदयनराजे म्हणाले.