पाटण : कृषी पंपाचा वीज पुरवठा सातत्याने खंडित होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. रात्री-अपरात्री शेतकरी शिवारात पिकाला पाणी देण्यासाठी जात असतात. वीज नसल्याने त्यांची निराशा होत आहे. वीज पुरवठा सुरळीत ठेवण्याची मागणी होत आहे.
रस्त्याची दुरवस्था
पाटण : पाटण ते चाफोली रस्त्याची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली आहे. त्यामुळे या रस्त्यावरून वाहने चालविताना चालकांना कसरत करावी लागत आहे. पाटणच्या पश्चिम बाजूकडे चिपळूण महामार्गापासून चाफोली रस्त्याला सुरुवात होते. दोन-दोन फुटाचे खोल आणि आकार वाढत चाललेले खड्डे वाहनधारक व प्रवाशांना सध्या त्रासदायक ठरत आहेत.
गवत वाढले
कऱ्हाड : ढेबेवाडी फाटा ते कोल्हापूर नाका दरम्यानच्या महामार्गालगत नाल्यामध्ये गवत आणि झाडे-झुडूपे वाढली आहेत. त्यामुळे वाहनांना अडथळा निर्माण होत आहे, तसेच गटरमधील पाण्याच्या प्रवाहालाही अडथळा होत आहे. पाणी साचून राहिल्याने दुर्गंधी पसरत असून, त्यांचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे.
डासांचा उपद्रव
कऱ्हाड : वातावरणातील बदलामुळे कऱ्हाडसह मलकापूर, आगाशिवगर नगर परिसरात डासांच्या उत्पत्तीत वाढ झाली आहे. घरोघरी डासांचा त्रास वाढल्याने नागरिक हैराण झाले आहे. अगोदरच वातावरणात निर्माण झालेला गारवा आणि त्यातच डासांचा उपद्रव वाढल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. डासांपासून बचाव करण्याचा प्रयत्न होत आहे.