परळी : परळी खोऱ्यात गेल्या काही दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे. दररोच तासनतास वीज गायब होऊ लागल्याने शेतकऱ्यांसह ग्रामस्थांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. परळी खोऱ्यात गेल्या आठवड्यात प्रचंड पाऊस झाला. या पावसामुळे ठिकठिकाणच्या वीज वाहिन्या तुटल्याने याचा वीज पुरवठ्यावर परिणाम झाला आहे.
धबधबे लागले कोसळू
मेढा : जावळी तालुक्यात गेल्या चार दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे येथील केळघर घाटात अनेक ठिकाणी लहान-मोठे धबधबे कोसळू लागले आहेत. मुसळधार पावसामुळे काही दिवसांपूर्वी घाटरस्ता वाहून गेला आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे.
बंदोबस्ताची मागणी
सातारा : शहरासह परिसरात गेल्या काही दिवसांपासून भटक्या श्वानांनी उपद्रव मांडला असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.हे श्वान ये-जा करणारे पादचारी तसेच वाहनधारकांच्या अंगावर धावून जात आहेत. पालिकेने भटक्या श्वानांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
सांडपाणी रस्त्यावर
सातारा : सदर बझार परिसरात रस्त्यावरील सांडपाणी मुख्य रस्त्यावर आल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. या ठिकाणाहून ये-जा करणाऱ्या नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. पालिकेच्या आरोग्य विभागाने याबाबत तातडीने उपाययोजना करून नागरिकांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी होत आहे.
रिफ्लेक्टरची मागणी
सातारा : पुणे - बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर काही ठिकाणी रिफ्लेक्टर तसेच दिशादर्शक फलक नाहीत. त्यामुळे वाहनचालकांमध्ये संभ्रम निर्माण होतो. रिफ्लेक्टर नसल्यामुळे महामार्गावर लहान-मोठे अपघात घडू लागले आहेत. त्यामुळे महामार्गावर तत्काळ रिफ्लेक्टर बसविण्याची मागणी वाहनचालकांतून होत आहे.
अपघाताला निमंत्रण
पळशी : मोही (ता. माण) येथील शिंगणापूर - म्हसवड मार्गावरील स्मशानभूमीशेजारी असणाऱ्या नागमोडी वळणाला झुडपांनी वेढा दिला आहे. त्यामुळे बऱ्याचदा समोरून येणारे वाहन चालकांच्या नजरेस पडत नाही. यामुळे या धोकादायक वळणावर अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे.
स्वच्छतेची मागणी
सातारा : येथील महात्मा फुले भाजी मंडई व मार्केट यार्ड परिसरात काही ठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे दुर्गंधी पसरल्याने व्यावसायिक व नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. मंडई परिसराची स्वच्छता करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.