भरणे यांचा सत्कार
सातारा : वाई पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदी बाळासाहेब भरणे यांची नियुक्ती झाल्याबद्दल पांडेवाडी ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंच संतोष फणसे उपसरपंच पंढरीनाथ दळवी निलेश देशमाने यांनी भरणे यांचा सत्कार केला. कार्यक्रमास शिक्षण मंडळाचे अध्यक्ष तानाजी वाशिवले, सुरेश शिंदे, साईनाथ भोसले, सुभाष पाटणे, गजानन गुळूमकर, संतोष मोहिते आदी उपस्थित होते.
लोकरे यांचे मार्गदर्शन
सातारा : ओबीसी आरक्षणासाठी संघटनेच्यावतीने माजगाव येथे झालेल्या कार्यक्रमात अध्यक्ष भरत लोकरे यांनी मार्गदर्शन केले. ओबीसी आरक्षणासाठी अनेक राजकीय पक्ष प्रयत्न करीत आहेत; मात्र त्यातून वेगळेच विचार उमटत आहेत. आरक्षणासाठी ओबीसी बांधवांनी रस्त्यावर उतरावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
पुष्पहारांचे दर दुप्पट
सातारा : गणेशोत्सवाच्या काळात फुलांची व हारांची मागणी वाढू लागली आहे. त्यामुळे घरांचे दर दुप्पट झाले असून, सार्वजनिक गणेश मंडळांसाठी सर्वाधिक मागणी असणाऱ्या गुलछडीच्या फुलांचा दर सुमारे आठशे रुपये किलोवर गेला आहे. विविधरंगी फुलांची आवक समाधानकारक असल्याने गणेशोत्सवाच्या क्षणांपर्यंत हारांचे दर स्थिर राहण्याची शक्यता आहे.
जंतुनाशक फवारणीची मागणी
सातारा : डेंग्यू तसेच इतर आजारांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून पालिकेने शहरातील नालेसफाई करून जंतुनाशक यांची फवारणी करावी अशा मागणीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा सामाजिक न्याय विभागाच्या वतीने नुकतेच मुख्याधिकाऱ्यांना देण्यात आले. शहरात सर्वत्र जंतुनाशक धूर फवारणी करावी, तसेच नाल्याची स्वच्छता करावी असे या निवेदनात म्हटले आहे. दूषित पाणीपुरवठा होणार नाही याचीही पालिकेने दक्षता घ्यावी, अशी सूचना अध्यक्ष अनिल बडेकर यांनी निवेदनात केली आहे.
पुस्तकांचे प्रकाशन
सातारा : कासानी तालुका सातारा येथील प्राथमिक शिक्षक राजेंद्र बोबडे यांनी लिहिलेल्या चिंतन एक जीवन वेध आणि विचार वेध या पुस्तकांचे प्रकाशन झाले. यावेळी जलतरणपटू सतीश कदम, महादेव भोकरे, अनिल जायकर, संजीवन जगदाळे, गणेश जाधव उपस्थित होते. शिवाजी भोसले यांनी प्रास्ताविक केले. जितेंद्र ढमाल यांनी आभार मानले. यावेळी दत्तात्रय कोरडे, नितीन जाधव, जनार्धन घाडगे, नरेश कारंडे, योजना बोबडे उपस्थित होते.