सातारा : सातारा शहराच्या पश्चिम भागात असलेल्या वेंकटपुरा पेठेत गेल्या काही दिवसांपासून सकाळी विद्युत पुरवठा खंडित करण्याचे प्रमाण वाढले आहे. रविवारी सकाळी अकरा वाजता खंडित झालेला वीजपुरवठा दुपारी तीन वाजता सुरू झाला. त्याचप्रमाणे सोमवारीही सकाळी अकराच्या सुमारास विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला होता. तो बारानंतर पूर्ववत सुरू झाला.
0००००००००
गावोगावच्या यात्रा रद्द
सातारा : कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने जिल्हा प्रशासनही हतबल झाले आहे. लोकांनी गर्दी करू नये म्हणून प्रशासनाने गावोगावच्या यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी पोलीस, तहसील कार्यालयातर्फे बैठका घेऊन यात्रा न भरविण्याबाबत आवाहन केले जात आहे. त्याला ग्रामस्थांतूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे.
००००००००००
पाणी गळती सुरू
सातारा : सातारा शहराच्या पश्चिम भागातील मंगळवार तळे येथील जलवाहिनीला रविवारी सकाळी गळती लागली होती. यामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी वाहून गेले. उन्हाळ्यामध्ये पाणी गळती लागल्याने रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये पाणी वाहत होते. यामुळे डबक्यांचे स्वरूप आले होते. यातून वाहने गेल्यामुळे पाणी पादचाऱ्यांच्या अंगावर उडत असल्याने वादावादीही होत होती.
0०००००००
भाजीविक्रेते दारावर
सातारा : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारने लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्यामुळे साताऱ्यातील भाजी मंडई जिल्हा प्रशासनाने बंद केली आहे. सातारकरांची गैरसोय होऊ नये म्हणून गाड्यांवर भाजी, फळे घेऊन गल्लोगल्ली फिरत आहेत. त्यामुळे महिलांची चांगलीच सोय होत आहे.
००००
दुकानांमध्ये अजूनही गर्दी
सातारा : सातारा शहरासह ग्रामीण भागात लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्यातून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत. मात्र, कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी गर्दी टाळण्याचे आवाहन केले जात आहे. तरीही साताऱ्यातील अनेक दुकानांमध्ये ग्राहकांची गर्दी झालेली अनुभवण्यास मिळत आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग कसा रोखणार, असा प्रश्न निर्माण होत आहे.
००००००
महामार्गावर शुकशुकाट
सातारा : कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी राज्य शासनाने लॉकडाऊन जाहीर करून जिल्हा बंदी केली आहे. त्यामुळे पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर शुकशुकाट जाणवत आहे. अत्यावश्यक सेवेतील व्यक्तींच्याच गाड्या महामार्गावर दिसत आहेत. तसेच महामार्गावर अधूनमधून पोलिसांकडून तपासणी केली जात आहे. त्यामुळे लोकही बाहेर पडत नाहीत.
-------------
बांध पेटविणं सुरूच
सातारा : सातारा शहराला लागून असलेले डोंगर विघ्नसंतोषी मंडळींकडून पेटविले जात होते. यामध्ये मोठ्या प्रमाणावर वनसंपदा जळून खाक झाल्या आहेत. आता हे प्रमाण कमी झाले असले तरी अनेक शेतकरी बांधावर जाऊन पालापाचोळा पेटवून देत आहेत. हीच आग पुढे डोंगरांकडे सरकून वणवा लागत आहे.