ढेबेवाडी : पवारवाडी-निवी-कसणी रस्त्यावरील पूल वाहून गेल्याने आठ दिवसांपासून रहदारी बंद झाली आहे. याच रस्त्यावर डोंगर खचून दरड रस्त्यावर कोसळल्याने पाऊलवाट बंद झाली आहे. या अडचणींचा सामना करताना विद्युत पुरवठा ही खंडित झाला. यामुळे बंद असलेली वाहतूक आणि विजेचे खांब कोसळून व तारा तुटून बंद पडलेला वीजपुरवठा अद्यापही सुरू झालेला नाही. परिणामी वाल्मिक पठारावरील कसणी, घोटील, निगडेसह वाड्यावस्त्यांमधील जनता अनेक संकटांचा सामना करीत आहे.
वाल्मिक पठारावर जाणाऱ्या पवारवाडी (कुठरे), निवी, कसणी, घोटील (वरचे), निगडे या गावांना जोडणाऱ्या रस्त्यावरील कसणी येथील ओघळीवरील पूल तुटला आहे. यामुळे रहदारी बंद पडली. याच रस्त्यावर डोंगरकडा घसरून मातीचा ढिगारा रस्त्यावर आला. यामुळे पठारावरील गावांवर दुहेरी संकटच कोसळले. वाहतूक पूर्ण ठप्प झाली आहे.
शासकीय अधिकाऱ्यांना पूल तुटल्याची, दरड कोसळून रस्त्यावर आल्याने दळणवळण ठप्प झाल्याबाबत माहिती दिली. मात्र आठवडा उलटून गेला तरी काहीही घडलेले नाही. प्रशासनाच्या या बेफिकिरीने जनता मात्र पठारावर अडकून पडली आहे. वीज वितरणाची तर पुरती दैना झाली आहे. आठवडा उलटला तरी वीजपुरवठा सुरळीत झालेला नाही.
जिंती विभागातून पठारावर जिंती, निगडे, माईंगडेवाडी, घोटील, कसणी अशा वीजवाहिन्या टाकलेल्या आहेत; पण आजही पठारावर जवळजवळ सर्व गावे अंधारात चाचपडत आहेत. मात्र वीज वितरणला वीजपुरवठा सुरळीत करण्यात यश मिळाले नाही. पाणी पुरवठ्याची स्थिती बिकट झाली आहे. कूपनलिकांवर विद्युत मोटर बसविलेल्या आहेत; पण वीज नाही. त्यामुळे पाणी नाही, कुणी आजारी पडले तर दळणवळण बंद आहे. प्रशासनाचे लक्ष नाही. परिणामी पठारावरील जनतेवर अत्यंत बाका प्रसंग ओढवला आहे. तातडीने या सुविधा दुरुस्ती करा, अशी मागणी होत आहे.
फोटो ३१ढेबेवाडी
कसणीच्या पुढे घोटील, निगडेकडे जाणाऱ्या रस्त्यावर दरड कोसळून झाडाझुडपांसह मातीचा ढिगारा रस्त्यावर आला आहे. यामुळे वाहतूक बंद पडली आहे. (छाया : रवींद्र माने)