गत अनेक दिवसांपासून विजेचा विस्कळीत पुरवठा सुरू आहे. पहाटे खंडित झालेली वीज रात्री दहा वाजले तरी सुरू झालेली नसते. त्यामुळे ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. वीज बिल वसुलीसाठी जेवढी तत्परता दाखविली जाते तेवढी तत्परता वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी दाखवली जात नाही. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्य मात्र याबाबत मौन पाळून आहेत. वीज पुरवठा सुरळीत सुरू करण्यासाठी त्यांच्याकडून प्रयत्न होताना दिसत नाहीत. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे. लॉकडाऊनच्या काळात ग्रामस्थांना भरमसाठ वीज बिल मिळाले. त्यामुळे महावितरणला आधीच ग्रामस्थांच्या असंतोषाला तोंड द्यावे लागत आहे. त्यातच परिसरात दिवसातून तीन ते चार वेळा अर्ध्या तासासाठी वीज पुरवठा खंडित होत आहे.
वीज दरवाढ, स्थिर आकार, वीज शुल्क या अतिरिक्त कराने वीज बिलांचा आकडा भरमसाठ वाढत आहे. त्या तुलनेत सुविधा मात्र देण्यात येत नाहीत. सातत्याने अखंड पुरवठा करण्यात यंत्रणा पूर्णत: असक्षम ठरत आहे. त्यामुळे आता दाद कुणाकडे मागायची, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
- चौकट
डोंगर पठारावर विजेच्या समस्या कायम
ग्रामीण भागासह शहरी भागात कमी दाबाने वीज पुरवठा होत आहे. डोंगर पठारावरील गावात विविध समस्याही कायम आहेत. त्यामुळे ग्रामस्थ हैराण झाले आहेत. गत आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसापासून मोरणा विभागातील अनेक गावांमध्ये चार ते पाच दिवस झाले वीज गायब आहे. काही गावांमध्ये कमी दाबाने वीज पुरवठा होत आहे.