धामणेर : धामणेर (ता. कोरेगाव) येथील टंकसाळे व कोकीळ वस्तीवरील वादळी पावसाने दोन विद्युत डीपींचे खांब पडल्यामुळे दहा दिवस विद्युत पुरवठा खंडित झाला असून, अद्याप तरी विद्युत मंडळाने वीजपुरवठा सुरळीत न केल्यामुळे येथील सुमारे तीनशे एकर बागायती क्षेत्रातील पिके धोक्यात आली असून, शेतकऱ्यांनी वारंवार मागणी करूनही वीज बिल भरा तरच आम्ही सुरू करू, असे रहिमतपूर विद्युत मंडळाच्या अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे.
धामणेर येथील ब्रह्मपुरीनजीक टंकसाळे वस्ती व कोकीळ वस्ती येथे कृष्णा नदीकाठावर दोन विद्युत डीपी आहेत. या डीपीवर सुमारे तीस ते पस्तीस विद्युत पंप आहेत. यावर सुमारे ३०० एकर बागायती क्षेत्र आहे. यामध्ये शेतकऱ्यांची ऊस, भुईमूग, आले, तरकारी अशी महत्त्वाचे पिके आहेत. या विद्युत डीपीमधील काही दोन टक्के शेतकऱ्यांनी वीज बिले भरली नाहीत; परंतु बाकीच्या शेतकऱ्यांनी बिले भरलेली आहेत. अशा शेतकऱ्यांचे उन्हाळी दिवसात फार मोठे नुकसान होण्याचा धोका विद्युत मंडळाच्या अधिकाऱ्यांच्या अजब कारभारामुळे होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ज्या शेतकऱ्यांनी वीज बिले भरली नाहीत, त्यांची विद्युत कनेक्शन बंद करा; परंतु ५० टक्के सवलतीत शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन ज्यांनी वीज बिले भरली आहेत त्यांचे तरी विद्युत पंप चालू करावेत, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होऊ लागली आहे. तरीसुद्धा अधिकारी विद्युत पुरवठा सुरळीत करीत नाहीत. त्यामुळे चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याचा प्रकार विद्युत विद्युत मंडळाकडून होत आहे, अशी भावना शेतकऱ्यांची होऊ लागली आहे. त्यामुळे शेतकरी आक्रमक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
(कोट)
आम्ही शेतकऱ्यांच्यावतीने रहिमतपूर कार्यालयातील अधिकाऱ्यांना चार-पाच वेळा विद्युत डीपी बंद आहे, असे सांगितले. तरीसुद्धा आम्हाला वरून आदेश आहेत. तेव्हा आम्ही विद्युत डीपी सुरू करू शकत नाही, असे अधिकारी सांगत आहेत. आमची सुमारे पन्नास एकर क्षेत्र या डीपीवर आहे. त्यामुळे आमचे मोठे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वीज बिल थकीत आहेत त्यांची कनेक्शन बंद करा, बाकीचे तरी सुरू करावीत. शेतकऱ्यांना न्याय मिळावा व विद्युत पुरवठा सुरळीत करावा.
-सागर कोकीळ शेतकरी, धामणेर (ता. कोरेगाव)
(कोट)
विद्युत डीपीवरील सर्व शेतीपंपाची वीज बिले भरल्याशिवाय दुरुस्ती कामाची मागणी करू नये अशाप्रकारे महावितरणचे आदेश आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी थकीत बिले भरावीत, नंतर खांबांची कामे करून विद्युतपुरवठा सुरळीत करता येईल.
-थोरवडे, शाखाप्रमुख महावितरण, रहिमतपूर (ता. कोरेगाव)
१९धामणेर
फोटो. : धामणेर (ता. कोरेगाव) येथे वादळी पावसामुळे विद्युत खांब पडलेले आहे. (छाया : शशिकांत क्षीरसागर)