पळशी : माण तालुक्यातील पळशीतील माळीखोरा परिसरात विजेची चोरी मोठ्या प्रमाणात होत असून, अनेक ठिकाणी खांबावर आकडे टाकल्याचे दिसत आहे. अगदी घरगुती वापरापासून ते विद्युत मोटारी चालवण्यापर्यंत आकडे टाकून वीज चोरी होत आहे. त्यामुळे वीज मंडळाच्या नुकसानीबरोबरच लोड येऊन जिल्हा परिषद शाळेजवळील वीज ट्रान्सफॉर्मरमध्ये वारंवार बिघाड होत आहे.
माळी खोरा परिसरात विजेच्या आकड्यावर अनेक बहाद्दर पिठाची चक्की चालवून दिमाखात व्यवसाय करत आहेत. त्यामुळे येथील ट्रान्सफॉर्मरवर लोड येऊन वारंवार फ्यूज जात असल्याने याचा फटका नियमित ग्राहकांना बसत आहे तर फ्यूज बसवण्यासाठी कर्मचारी येत नसल्याने फ्यूज बसवण्याची तारेवरची कसरत येथील अशिक्षित शेतकऱ्यांना करावी लागत आहे. त्यामुळे काही जीवितहानी झाल्यास कोण जबाबदार, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.
मागील काही दिवसांपूर्वी येथील ट्रान्सफॉर्मर जळाला होता. याची कल्पना येथील शेतकऱ्यांनी वीज मंडळाला देऊनही दुरुस्तीसाठी दीड महिना चालढकल करण्यात आली. परिसरातील पिके जळून जाऊ लागल्याने शेवटी शेतकऱ्यांनी वर्गणी करून ट्रान्सफॉर्मर दुरुस्त केला. वीजमंडळ दुरुस्तीसाठीही प्रयत्न करत नाही आणि वीज चोरीही थांबवत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड झाला तरी कर्मचारी चार-चार दिवस फिरकत नसल्याने नियमित ग्राहकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. सध्या ट्रान्सफॉर्मरची दुरवस्था झाली असून, वारंवार वीज जात असून, विजेवरील उपकरणे खराब होत आहेत. वीज मंडळाने त्वरित दखल घेऊन ट्रान्सफॉर्मर दुरुस्त करून वीज चोरांना चाप बसवत अखंड वीज सेवा द्यावी, अशी मागणी होत आहे.
(चौकट)
शेतकरी हेलपाट्याने बेजार..
सध्या उन्हाळी पिके, भाजीपाला काही शेतकऱ्यांनी केला आहे. पिकाला पाणी देण्यासाठी मोटार चालू करून शेतकरी शेतात पोहचतो न पोहचतो तोपर्यंत ट्रान्सफॉर्मरमधील फ्यूज गेलेला असतो. त्यामुळे वारंवार फ्यूज बसवून शेतकरी मेटाकुटीला आला आहे.
प्रतिक्रिया
वीज चोरी करताना कोणी आढळून आल्यास संबंधितांवर वीज वितरणच्या नियमानुसार कारवाई केली जाईल.
- एस. ए. थोरात, वीजवितरण अधिकारी, म्हसवड
फोटो १६पळशी वीज
माण तालुक्यातील पळशीतील माळीखोरा येथे खांबावर आकडे टाकून वीज चोरी होत आहे.