दत्ता यादव ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये केवळ जिल्हा शल्यचिकित्सकांच्या केबीनबाहेरील परिसर सोडला तर इतर ठिकाणी नाक धरूनच रुग्ण आणि नातेवाइकांना रुग्णालयात प्रवेश करावा लागत आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली असताना याकडे कोणाचेच लक्ष नाही. सिव्हिलच्या बजबजपुरीच्या सहवासात अनेक रुग्णांना नाईलाजाने मुक्काम करावा लागत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर येत आहे.चार वर्षांपूर्वी रुग्णसेवेच्या दर्जामध्ये राज्यात सर्वोत्तम म्हणून केंद्र शासनाने गौरविलेल्या जिल्हा शासकीय रुग्णालयाला यंदा शेवटचे स्थान मिळाले. त्याचे कारण रुग्णसेवेचा दर्जा खालावल्याचे स्पष्ट झाले. हे सर्वश्रूत असताना आता तर रुग्णालयात उपचारापेक्षा रुग्णांना धास्ती आहे ती अस्वच्छतेची. सिव्हिलच्या मुख्य प्रवेशद्वारापासून आत प्रवेश केल्यानंतर केसपेपर काढण्याचा विभाग निदर्शनास येतो. या ठिकाणी सकाळी नऊपासून ते दुपारी बारापर्यंत रुग्ण आणि नातेवाइकांची नुसतीच वर्दळ असते. त्यामुळे येथे बऱ्यापैकी स्वच्छता केलेली असते. सिव्हिलमधील सगळ्यात चकाचक परिसर म्हणजे जिल्हा शल्यचिकित्सक अमोद गडीकर यांच्या केबीनबाहेरील. या ठिकाणी दुर्गंधीचा लवलेशही येणार नाही. इतकी खबरदारी घेतली जातेय. परंतु इतर वॉर्ड आणि वॉर्डच्या बाहेरची परिस्थिती या उलट आहे.वॉर्डच्या बाहेर असलेल्या लॉबीमध्ये आजूबाजूला भिंतीवर पान खाऊन थुंकलेले डाग पडले आहेत. या लॉबीमधून वॉर्डमध्ये जाताना नाकाला हात किंवा रुमाल बांधून अनेकजण ये-जा करत असताना दिसत आहेत. तळघरातील वॉर्डच्या बाहेरचे ड्रेनेज लिकेज झाल्यामुळे अस्वच्छ पाणी बाहेर येत आहे. त्यामुळे आणखीनच मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरलीय.डासांचे प्रमाणही वाढलेय. रात्री रुग्णांसोबत असलेले नातेवाईक वॉर्डसमोरील लॉबीमध्ये झोपतात. त्यांना डास आणि दुर्गंधीमुळे झोप लागत नाही. एकंदरीत ओपीडी कक्ष आणि डॉ. गडीकरांचा परिसर सोडला तर सिव्हिलमध्ये बजबजपुरीच आहे. अशा या बजबजपुरीमध्ये रुग्णआणि त्यांच्या नातेवाइकांना नाईलाजाने दहा ते बारा दिवस मुक्काम करावा लागत असल्याचे पाहायला मिळत आहे.सफाई कर्मचारी भलत्याच कामात..सिव्हिलमध्ये एकूण ४४ सफाई कामगार आहेत. त्यापैकी १५ जणांची ठेकेदार पद्धतीने नेमणूक करण्यात आली आहे. यातील बहुतांश कर्मचारी आॅपरेशन थिअटर, ओपीडी आदी विभागात काम करत आहेत. तर बरेचजण रजेवर असतात. त्यामुळे उरलेल्या कर्मचाऱ्यांवर सिव्हिलच्या स्वच्छतेची जबादारी असते. परंतु त्यांच्याकडून स्वच्छता का होत नाही, हे मात्र, गुलदस्त्यातच आहे.चार वर्षांपूर्वीचे सिव्हिल कसे होते?सिव्हिलचा सुमारे चार वर्षांपूर्वी अक्षरश: कायापालट झाला होता. त्यावेळच्या रुग्णालय प्रशासनाने स्वच्छता आणि रुग्णांवर वेळेवर उपचाराला प्राधान्य दिले होते. सिव्हिलमधील कोणत्याही वॉर्डमध्ये गेल्यास दुर्गंधी येत नव्हती. आपण खासगी हॉस्पिटलमध्ये आलोय की काय, असा अनेकांना भास होत होता. इतकी स्वच्छता त्यावेळी होती. भिंतीवर कोठेही थुंकलेले डाग दिसत नव्हते. त्यामुळेच सिव्हिलला राज्यात पहिले स्थान मिळाले होते. याची आजही अनेकजण आठवण काढतात.घरी जाताना इंजेक्शन..रुग्णासोबत दहा ते बारा दिवस रुग्णालयात वास्तव्य केलेले नातेवाईकही अस्वच्छतेमुळे आजारी पडत आहेत. रुग्णाला घरी सोडताना नातेवाइकालाही इंजेक्शन घेऊन घरी जावे लागत असल्याचे चित्र रुग्णालयात पाहायला मिळत आहे. रुग्णालयाची स्वच्छता नेमकी कधी होणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
सिव्हिलमधील रुग्णांचा बजबजपुरीत मुक्काम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2019 11:43 PM