सातारा : मी कधीही गुंडगिरी केली नाही. कारण माझ्या गावात प्रभाकर देशमुख यांचं निवडणूक बूथ असतो. त्यांना मतेही पडतात. मी गुंडगिरी केली तर ते घरातून बाहेरही पडले नसते. त्यांची अपेक्षा असेल तर तसा विचार करू, असा इशारा आमदार जयकुमार गोरे यांनी दिला. सातारा येथील शासकीय विश्रामगृह येथे पत्रकारांशी आमदार गोरे यांनी संवाद साधला. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मनोज घोरपडे आदी उपस्थित होते. साताऱ्यात टंचाई आढावा बैठकीसाठी आल्यानंतर ते शासकीय विश्रामगृहात बोलत होते. आमदार गोरे म्हणाले, जिल्ह्यात प्रचंड दुष्काळ पडण्याची चिन्हे आहेत. जिल्ह्यातील कोयना धरण भरले नाही. ८७ टीएमसी पाणीसाठा आहे. तसेच उरमोडी धरण नेहमी भरते. यावर्षी ६० टक्के पाणी आहे. तसेच अनेक तालुक्यात चारा टंचाई जाणवत आहे. चारा छावणी सुरू करावी लागेल. पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरू आहेत. याबाबत शासनही गंभीर आहे. या दुष्काळला ताकदीने सामोरे जायला लागणार आहे. आता परतीचा मान्सून सुरू होईल. तो चांगला पडावा अशीच भावना आहे. यावेळी आमदार गोरे यांना पत्रकारांनी विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक - निंबाळकर यांनी अजित पवार यांना मुख्यमंत्री करण्याबद्दल भाष्य केल्याचा प्रश्न केल्यावर ते म्हणाले, त्यांनी शरद पवार यांना पंतप्रधान करण्याचे स्वप्न पाहिले होते. तसेच हे स्वप्न असावे, असा टोला लगावला. तर रोहित पवार यांनी मानमधील राष्ट्रवादीच्या सभेत पालकमंत्री दुष्काळ पाहणीसाठी आले नसल्याची टीका केली होती, पत्रकारांच्या या प्रश्नावर आमदार गोरे यांनी त्यांच्या तोंडी हे शोभत नाही. ज्या लोकांनी या भागात कायम दुष्काळ राहावा ही व्यवस्था केली. त्यांनी असे बोलावे हे हास्यास्पद आहे, असा प्रहार केला. मानमध्ये महिलेला मारहाण निषेध... माण तालुक्यात एका महिलेला मारहाण झाल्याचा प्रश्न पत्रकारांनी केल्यावर आमदार गोरे यांनी झालेली घटना निंदनीय आहे. याचा निषेध आहे, असे सांगून याबाबत मी पोलिसांशी बोललो आहे असेही स्पष्ट केले.
गुंडगिरी केलीतर प्रभाकर देशमुख घरातून बाहेर पडले नसते - जयकुमार गोरे
By नितीन काळेल | Published: August 31, 2023 7:31 PM