सातारा : येथील शाहूनगर परिसरात आलेल्या भेकरावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्याने ते गंभीर जखमी झाले होते. मात्र, या भेकराला संतोष घुले आणि प्रकाश घुले या दोघा बंधूंनी कुत्र्यांच्या तावडीतून सोडवून प्राण वाचवले. त्यानंतर भेकराला वनविभागाच्या ताब्यात दिले.
येथील अजिंक्यतारा किल्ल्याच्या पायथ्याला शाहूगनर येथील रुणकामाता मंदिर परिसरात घुले बंधू राहण्यास आहेत. त्यांना सकाळी सहाच्या सुमारास कोणत्यातरी प्राण्याच्या ओरडण्याचा आवाज येऊ लागला. त्यामुळे संतोष आणि प्रकाश घुले हे दोघे घराच्या पाठीमागे आवाजाच्या दिशेने गेले. त्यावेळी त्यांना एक भेकर भटक्या कुत्र्यांच्या तावडीत सापडल्याचे दिसले. दोघांनीही क्षणाचा विलंब न करता कुत्र्यांना हुसकावून लावले आणि भेकराची सुटका केली.
कुत्र्यांच्या हल्ल्यात भेकर गंभीर जखमी झाले होते. त्याला पाणी पाजल्यानंतर संतोष घुले यांनी सातारा वन विभागाचे सुहास भोसले यांना फोन करून जखमी भेकराबाबत माहिती दिली. काही वेळानंतर भोसले आले आणि त्यांनी भेकर ताब्यात घेतले. यानंतर त्या भेकराला वनविभागाच्या कार्यालयात नेऊन उपचार सुरू करण्यात आले. जखमा गंभीर असल्याने दोन-तीन दिवस उपचारानंतर भेकराला नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात येईल, असे भोसले यांनी सांगतिले.