सातारा : घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या शाळेत शिक्षणाचे धडे गिरविले त्या प्रतापसिंह हायस्कूलमध्ये दोन महिने मराठी आणि इंग्रजीचे शिक्षक नव्हते. याविषयी ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिध्द झाल्यानंतर जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्यावतीने बुधवारी शाळेवर शिक्षिकेची नेमणुक केली आहे. तब्बल दोन महिन्यांनी प्राथमिकच्या वर्गावर मराठी शिकवणी सुरू झाली. अद्यापही माध्यमिकच्या वर्गांना विषय शिक्षकाची प्रतिक्षाच आहे.येथील प्रतापसिंह शाळेत मराठी आणि इंग्रजी भाषा शिकवण्यासाठी शिक्षक नव्हते. परिणामी विद्यार्थ्यांचा या विषयातील अभ्यासाच झाला नव्हता. याविषयी पालकांनी शिक्षण विभागाकडे दाद मागितली, तर तिथेही शासकीय कारभाराचा नमुना अनुभवल्याने पालक त्रस्त झाले. प्रशासनाच्या कारभारामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीचे पातक कोणाच्या माथी मारायचे असा संतप्त सवाल पालकांकडून उपस्थित करत पालकांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर शिक्षिकेची नेमणुक करण्यात आली आहे.
शिक्षक आमचा मानधन तुमचेप्रतापसिंह शाळेबरोबर रयत शिक्षण संस्थेने सामंजस्य करार केला आहे. या करारानुसार शाळेची गुणवत्ता वाढविण्यासाठी रयत शिक्षण संस्था प्रयत्न करणार आहे. यासाठी आवश्यक शिक्षकांची नेमणुकही संस्था पातळीवर होते. दोन महिने विषय शिक्षक नाही म्हटल्यावर याबाबत रयतकडे शिक्षकांची मागणी केल्यानंतर शिक्षक आम्ही देतो त्यांचे मानधन तुम्ही द्या असा गजब पर्याय त्यांच्यासमोर ठेवण्यात आला.या सर्व बाबींना शासकीय मान्यता मिळण्याची प्रक्रिया किचकट असल्यामुळे अधिकच विलंब झाला.
प्रतापसिंह हायस्कूलमध्ये शिक्षक मराठी भाषा शिकवायलाच शिक्षक नसल्याने मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. याबाबत समाज माध्यमांवरून ‘लोकमत’ने प्रसिध्द केलेली बातमी व्हायरल केल्यानंतर आमदार सत्यजीत तांबे यांच्यासह शिक्षण विभागातील उच्च अधिकाऱ्यांनी संपर्क करून विषय समजुन घेतला. त्याचाच परिणाम म्हणून बुधवारी शिक्षिक रूजू झाल्या. माध्यमिकच्या इंग्रजी विषयाचा प्रश्न संपुष्टात नाही आला तर आंदोलन करणार. - प्रशांत मोदी, पालक