सातारा : कटगुण (ता. खटाव) येथील रहिवासी असलेले व सध्या राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलायझर कंपनीत मुंबई येथे केमिकल इंजिनिअर पदावर कार्यरत असलेल्या प्रवीण जगन्नाथ बहिरट यांना महाराष्ट्र शासनाच्यावतीने गुणवंत कामगार पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. मुंबई येथे नुकत्याच झालेल्या या कार्यक्रमात कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील, राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला.
प्रवीण बहिरट हे कटगुण (ता. खटाव) येथील असून त्यांचे प्राथमिक शिक्षण कोरेगाव येथील सरस्वती विद्यालयात, तर पुढील शिक्षण बारामती येथे झाले. बहिरट हे १९९१ पासून राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलायझर कंपनीत केमिकल इंजिनिअर या पदावर काम करीत असून कंपनीच्या उत्पादन वाढीविषयक कार्यक्रमात सतत सहभागी असतात. २००९ मध्ये कंपनीच्या अमोनिया प्लॅन्टमध्ये आग आटोक्यात आणून दुर्घटना टाळण्यात त्यांनी प्रयत्न केला. त्याची दखल घेऊन कंपनीने त्यांना विशेष पुरस्कार देऊन सन्मानित केले होते. २०१३-२०१४ मध्ये कंपनीने कैझन श्री व २०१४-२०१५ मध्ये कैझन भूषण पुरस्कार देऊन गौरविले आहे. तसेच २०११ च्या औद्योगिक क्षेत्रातील सर्वोच्च अशा ‘श्रम श्री पंतप्रधान’ पुरस्कारासाठीही कंपनीने प्रवीण बहिरट यांचे नामनिर्देशन केले आहे. युरिया खताची दुधात होणारी भेसळ टाळण्यासाठी निम कोटेड युरिया उत्पादन करण्याबाबत त्यांनी कंपनीकडे सादरीकरण केले व त्याचा उपयोग कंपनीने केला असून भेसळ प्रमाण कमी होण्यास मदत झाली आहे. तसेच एलईडी बल्ब सौरऊर्जेवर चालण्यासाठी त्यांनी केलेल्या सादरीकरणाची कंपनीकडून दखल घेण्यात आली आहे.
प्रवीण बहिरट हे सामाजिक कार्यातही कार्यरत असून रक्तदान शिबिर, कॅन्सर शिबिर, अनाथ गरीब विद्यार्थ्यांना मदत, आदिवासी कल्याण उपक्रम राबविण्यात ते अग्रेसर असतात. प्रवीण बहिरट हे सामाजिक कार्यातही कार्यरत असून रक्तदान शिबिर, कॅन्सर शिबिर, अनाथ गरीब विद्यार्थ्यांना मदत, आदिवासी कल्याण उपक्रम राबविण्यात ते अग्रेसर असतात. त्यांना मिळालेल्या गुणवंत कामगार पुरस्काराबाबत अनेकांनी त्यांचे कौतुक केले आहे.
फोटो ओळ : मुंबई येथे प्रवीण बहिरट यांचा गौरव मंत्री दिलीप वळसे-पाटील तसेच मंत्री बच्चू कडू यांच्या हस्ते झाला.
फोटो नेम : १२dio