सातारा : सातारा शहरासह परिसरात सोमवारी तिसऱ्या दिवशीही माॅन्सूनपूर्व पाऊस झाला. दुपारच्या सुमारास झालेल्या या पावसाने तर साताऱ्याला झोडपून काढले. जवळपास अर्धा तास जोरदार पाऊस पडत होता. तर सततच्या पावसामुळे शहराच्या पश्चिम भागातील शेतकऱ्यांच्या खरीप हंगामाच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. दरम्यान, कऱ्हाड, फलटण तालुक्यांतही पावसाने हजेरी लावली.
जिल्ह्यात या वर्षी उन्हाळ्यात सतत वळवाचे पाऊस होत राहिले. हे पाऊस मोठ्या प्रमाणात झाले नसले तरी उन्हाळा तीव्र जाणवू दिला नाही. सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांनी पाऊस लवकर होणार, या आशेने खरीप हंगाम पेरणीपूर्व मशागतीची कामे उरकून घेतली. त्यातच गेल्या काही दिवसांपासून सतत ढगाळ वातावरण तयार होत होते. त्याचबरोबर हवामान विभागाने माॅन्सूनचा पाऊस वेळेत होईल, असा अंदाज वर्तविलेला. पण, नवीन अंदाजानुसार काही दिवस उशीर होणार असला तरी जिल्ह्यात माॅन्सूनपूर्व पाऊस पडू लागला आहे.
सातारा शहरासह जिल्ह्यात काही ठिकाणी तीन दिवसांपासून पाऊस होत आहे. काही भागांत चांगला पाऊसही झाला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या खरीप हंगाम पेरणीच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. सातारा शहरात तर सोमवारी तिसऱ्या दिवशीही पाऊस झाला. सोमवारच्या पावसात जोर होता. दुपारी साडेबाराच्या सुमारास पावसाला जोरदार सुरुवात झाली. हा पाऊस सव्वा एक वाजेपर्यंत पडत होता. त्यानंतर पावसाचा जोर कमी झाला. या पावसामुळे गटारे भरून वाहिली तर रस्त्यावर पाण्याचे लोट वाहत होते.
दरम्यान, शहराच्या पश्चिम भागात सतत पाऊस होत होता. यामुळे शेतकऱ्यांनी खरीप हंगाम पेरणीची तयारी सुरू केली आहे. पूर्व भागात पेरणीसाठी आणखीही मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे.
........................................................