सातारा : जिल्ह्यात मान्सून पूर्व पाऊस होत असून बुधवारी अनेक भागात मेघगर्जनेसह हजेरी लावली. साताऱ्यातही रिमझिम तर माण तालुक्यात अनेक ठिकाणी दमदार पाऊस झाला. यामुळे शेतजमिनीत पाणी साचले. तसेच फलटण तालुक्यातही पावसाने हजेरी लावली. दरम्यान, कोयना धरण आणि नवजा येथेही पावसाची नोंद झाली आहे.जिल्ह्यात यावर्षी वळवाचा पाऊस झाला. पण, या पावसात जोर नव्हता. त्यामुळे ओढे-नद्यांना पाणी वाहिले नाही. फक्त वातावरणातील दाहकता कमी झाली. तरीही यंदा वळवाचे पाऊस कमीच झाले. तर मागील चार दिवसांपासून जिल्ह्यात थंडगार वारे वाहत होते. तसेच पाराही कमी झाला होता. यामुळे मान्सूनपूर्व पाऊस होण्याची चिन्हे होती. या अंदाजाप्रमाणे बुधवारपासून जिल्ह्यात मान्सून पूर्व पाऊस पडू लागला आहे. दिवसभरात अनेक ठिकाणी हजेरी लावली.
सातारा शहरात सकाळपासून ढगाळ वातावरण तयार झाले होते. दुपारी एकच्या सुमारास ढगांच्या गडगडाट सुरू झाला. तसेच रिमझिम पावसाला सुरुवात झाली. त्यानंतरही सायंकाळी उशिरापर्यंत ढगाळ वातावरण कायम होते. तर सातारा तालुक्यातही अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. तर सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात लवकरच पाऊस सुरू होणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.माण तालुक्याच्या काही भागातही पाऊस पडला. पूर्व तसेच पश्चिम भागात पावसाने हजेरी लावली. यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता. तर या पावसामुळे काही गावातील शेत जमिनीत पाणी साचले. तरीही खरीप हंगामाच्यादृष्टीने मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे. आता झालेल्या पावसाने काही भागात पेरणी पूर्व मशागतीची कामे मार्गी लागतील. पण, अनेक ठिकाणी मशागतीसाठी पावसाची प्रतीक्षा करावी लागणार आहे.तरीही सध्या मान्सून पूर्व पाऊस पडत असल्याने शेतकऱ्यांत आशेचे वातावरण तयार झालेले आहे. त्याचबरोबर फलटण शहरासह तालुक्यातही मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावली. शहरात जोरदार पाऊस झाला. यामुळे रस्त्यावरुन पाण्याचे लोट वाहिले.