वडूज : निमसोड येथील ग्रामदैवत श्री सिद्धनाथाच्या वार्षिक यात्रेनिमित्त आयोजित कुस्त्यांच्या जंगी मैदानात इराणच्या हादी पैलवानाने चमकदार कुस्ती करत प्रथम क्रमांक पटकविला. उपमहाराष्ट्र केसरी किरण भगत याच्या दुखापतीमुळे त्याला रिंगणातून माघार घ्यावी लागली. या कुस्ती मैदानाला खटाव- माण तालुक्यांसह इतर तालुक्यांतूनही अनेक प्रेक्षकांनी हजेरी लावलेली होती.खटाव तालुक्यात प्रथमच यात्रा काळात निमसोड येथे आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदान भरवून तालुक्यातील नवीन व भावी मल्लांमध्ये यात्रा कमिटीने नवचैतन्य निर्माण केले. यावेळी माण तालुक्यातील मागासवर्गीय प्रबोधनकार सहकारी सूतगिरणी येथील काही वर्षांपूर्वी भरलेल्या आखाड्याची यानिमित्ताने आठवण ताजी झाली.प्रथम क्रमांकाच्या तीन लाखांच्या इनाम कुस्तीत अवघ्या काही सेकंदातच इराणच्या हाडी पैलवानाने उपमहाराष्ट्र केसरी किरण भगतला अस्मान दाखविण्याचा प्रयत्न केला. मात्र ही कुस्ती निकाली घोषित करण्यात पंचांनी कोणतीच घाई केली नाही. काही काळ इराणचा पैलवान हादी व महाराष्ट्र केसरी किरण भगत यांच्यात ही कुस्ती काहीकाळ रखडली. शेवटी किरण भगतने दुखापतीमुळे मैदानातून माघार घेतल्याने इराणचा पैलवान हादी यास विजयी घोषित करण्यात आले. दुसऱ्या क्रमांकाच्या अडीच लाख बक्षिसांच्या कुस्तीत हरियाणाच्या बहादुरगड आखाड्यातील मनजित खत्रीने एकलंगी डावाचा वापर करत इराणच्या साजिद पैलवानाला नमवले. तसेच तृतीय क्रमांकाच्या कुस्तीत पैलवान योगेश बोंबाळेने पैलवान ज्ञानेश्वर गोचडेवर मात केली. पैलवान विजय धुमाळने पैलवान संतोष दोरवड याच्यावर घिस्सा डावाने मात करत कुस्ती जिंकली.अनिल धोत्रे, हनुमंत पुरी यांनी चटकदार कुस्त्या करीत आपले प्रतिस्पर्धी संदीप काळे व रवींद्र करे यांच्यावर विजय मिळविला. कर्नाटक केसरी कार्तिक काटे व हर्षद सदगीर यांच्यातील कुस्ती बराच काळ रखडल्याने बरोबरीत सोडविण्यात आली. कुस्त्यांचे धावते समालोचन करून कुस्तीत जिवंतपणा आणून शंकर पुजारी यांनी मैदानात चांगलीच रंगत आणली.इतिहासात प्रथमच आंतरराष्ट्रीय स्पर्धानिमसोड येथील श्री सिद्धनाथ वार्षिक रथोत्सवातील इतिहासात प्रथमच आंतरराष्ट्रीय ख्यातीचे पैलवान यांना आमंत्रित करून भरलेल्या कुस्ती मैदानाने तालुक्यातील प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. यावेळी तालुक्यातील नामांकित पैलवान यांनी पंचाची भूमिका पार पाडली तर यात्रा कमिटी ग्रामस्थ व ग्रामपंचायत यांनी या मैदानाचे नेटके नियोजन केले होते.
निमसोडच्या मैदानात इराणच्या पैलवान हादीचा वचक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2018 11:03 PM