औंध : खटाव तालुक्यातील दुष्काळी निमसोड येथील शेतकऱ्यांनी माळरानावर द्राक्षांच्या बागा फुलविल्या. असंख्य अडचणींवर मात करून पिकविलेल्या द्राक्षांची गोडी परदेशात पोहोचविण्यात त्यांना यश आले. कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत अंदाजे तीनशे टन द्राक्षांची निर्यात केली आहे. युरोपात निर्यातीचे हे चौथे वर्ष आहे.
सातारा जिल्ह्याला निसर्गाने भरभरून दिले आहे. पश्चिमेकडील सातारा, महाबळेश्वर, वाई, जावळी, पाटण तालुक्यात मुसळधार पाऊस पडतो. त्याच वेळी पूर्वेला माण, खटाव, फलटण तालुक्यांत कायमचा दुष्काळ आहे. त्या त्या भागातील शेतकरी निसर्गाशी जुळवून घेत काबाडकष्ट करून शेती करीत आहेत. खटाव तालुक्यातील ३५ ते ४० शेतकऱ्यांनी थॉमसन सीडलेस या द्राक्ष वाणाची लागवड केली आहे.
निमसोड येथील रामकृष्ण वरुडे, सुनील मोरे, राजेंद्र वरुडे, चेतन वरुडे, शुभम वरुडे, दीपक गायकवाड यांनी ग्रोप्लस एक्सपोर्ट कंपनी स्थापन केली. औंधचे सुपुत्र व मंडल कृषी अधिकारी दिलीप दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली द्राक्षे निर्यात करण्याचा निर्णय घेतला.
ही द्राक्षे परदेशात ७५ ते ९० रुपये प्रतिकिलो दराने विकली जात आहेत. दुष्काळी भाग असूनही येथील द्राक्षाचा दर्जा आणि गुणवत्ता अतिशय चांगली आहे.
विदेशातील लोकांना याची गोडी लागल्याने येथील मालाला विदेशी बाजारपेठेतदेखील चांगली मागणी आहे. निमसोड येथील तीनशे टन द्राक्षे अमेरिका, नेदरलँड, जर्मनी, युरोप देशांत निर्यात करण्यात आली आहेत. तालुका कृषी अधिकारी राहुल जितकर यांच्या मार्गदर्शनाखाली युरोपातील बाजारपेठेत दुष्काळी भागातील द्राक्षे पसंतीस उतरली आहेत.
चौकट :
खटाव तालुक्यातून आतापर्यंत ग्रोपल्स एक्स्पोर्ट व कृषी विभागाच्या सहकार्याने तीन लाख किलो द्राक्षे निर्यात झाली आहेत. एकेकाळी कोरडवाहू, दुष्काळी म्हणून समजल्या जाणाऱ्या खटाव तालुक्यातील शेतकरी आता परदेशात आपली वेगळी ओळख निर्माण करू लागला आहे.
प्रतिक्रिया :
आमच्या विभागाकडून आतापर्यंत साडेचारशे शेतकऱ्यांना निर्यातीसाठी लागणारे प्रमाणपत्र प्राप्त करून देण्यात आम्हाला यश मिळाले आहे. शेतकरी आता आधुनिक तंत्रज्ञान विकसित करू लागले आहेत. भारताच्या परकीय चलनवाढीस मदत होणार आहे.
- डी. एच. दाभाडे, औंध
फोटो : ०९निमसोड-ग्रेप्स
विदेशात द्राक्षे निर्यात करताना दिलीप दाभाडे, रामकृष्ण वरुडे, सुनील मोरे, राजेंद्र वरुडे, चेतन वरुडे, शुभम वरुडे, दीपक गायकवाड आदी उपस्थित होते. (छाया-रशीद शेख)