फलटण : कोरोनाच्या संसर्गामुळे आरोग्य यंत्रणेवर ताण पडला आहे. शारीरिक व मानसिक ताण सहन करत आरोग्य यंत्रणा काम करत आहेत. फलटण तालुक्यात अनेक गावांत आरोग्य उपकेंद्रे आहेत. या उपकेंद्रांत उपचार घेण्याला नागरिक पसंती देत आहेत.
खासगी दवाखान्यात भरमसाट पैसे देऊनही व्यवस्थित उपचार मिळत नसल्याने अनेक नागरिकांचा कल सरकारी दवाखान्यात जाण्याकडे वाढला आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता, सरकारी आरोग्य कर्मचारी मेहनत घेताना दिसत आहेत. विशेषतः साखरवाडी, गिरवी, बिबी या आरोग्य उपकेंद्रांत कोरोनावर उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. साखरवाडी उपकेंद्रातील आरोग्य कर्मचारी तर घरोघर जाऊन सर्व्हे करीत आहेत. बाधित रुग्णांच्या तब्बेतीची चौकशी केली जाते. त्यांच्यावर औषधोपचार तसेच विलगीकरणात असणाऱ्या रुग्णांना प्रत्यक्ष भेट देऊन तब्बेतीची तपासणी केली जाते. त्यांच्या सान्निध्यात असणाऱ्या इतर नातेवाईकांच्या तब्बेतीवरही लक्ष ठेवले जाते. त्यांना मानसिक आधार दिला जातो. यामुळे साखरवाडी गिरवी उपकेंद्रातील कर्मचाऱ्यांचे नागरिक कौतुक करताना दिसतात.
गिरवी उपकेंद्रातील डॉ. जगदाळे यांच्या उपचार पद्धतीवर परिसरातील नागरिक समाधानी आहेत. पण तालुक्यातील इतर गावांतील नागरिकही इथे उपचारासाठी जातात. त्यांच्या उपचार पद्धतीने रुग्ण चार-पाच दिवसात बरा होतो, असे कोरोना उपचार घेतलेले नागरिक सांगतात.
खासगी दवाखाना नको, असे म्हणत आता अनेक गावांत नागरिक सरकारी दवाखान्यातील औषध उपचारांवर समाधान व्यक्त करत आहेत.