प्रगती जाधव-पाटीलसातारा : आनुवंशिकता, आत्मप्रतिरक्षा रोग, वातावरण बदल, आहारातील बदल, आहारात येणारे कीटकनाशके, खते यातील कोणत्याही कारणाने स्त्री किंवा पुरुष वंध्यत्वाच्या समस्येला सामोरे जावे लागते. कमी वयात मासिक पाळी गेली असली तरीही एआरटी तंत्रज्ञानाच्या मदतीने किंवा आयव्हीएफ आणि अॅडव्हान्स आयव्हीएफने गर्भधारणा होत असल्याने प्री मॅच्युअर ओव्हरीयन फेल्युअरमध्ये जोडप्यांना दिलासा मिळाला आहे.रजोनिवृत्तीनंतर गर्भवती होणे हे महिलांसाठी आव्हानात्मक असते. मात्र, फर्टिलिटी उपचारांनी गर्भधारणा शक्य आहे. आधुनिक फर्टिलिटी उपचारांमध्ये महिलेची मासिक पाळी पुन्हा सुरू केली जाते आणि आयव्हीएफ उपचारांनी गर्भधारणेची शक्यता वाढवली जाते. रजोनिवृत्तीच्या कोणत्या टप्प्यात जोडपे आहे त्यानुसार आयव्हीएफतज्ज्ञ उपचार ठरवतात.
वंध्यत्वाची ही काही कारणेकरिअरला प्राधान्य देणाऱ्या या पिढीचे लग्नाचे वय वाढले आहे. लग्नानंतरही लगेचच बाळाची जबाबदारी घेण्याची मानसिकता नसल्याने पाळणा लांबणीवर पडतो. त्यातच नोकरी व्यवसायाच्या ताणामुळे गर्भधारणा रहायला विलंब होतो. वाढत्या वयात व्यायामाचा अभाव, सकस अन्न मिळण्याची वाणवा आणि शरीरात झालेल्या बदलांमुळे जोडप्यांमध्ये वंध्यत्वाच्या समस्या निर्माण होतात.प्री मॅच्युअर ओव्हरीयन फेल्युअर
- स्त्रियांच्या शरीरात विशिष्ट प्रमाणात स्त्री बीज असतात. प्रत्येक मासिक पाळी वेळी एक स्त्री बीज तयार होते अणि गर्भधारणा नाही झाल्यास ते मासिक पाळीच्या माध्यमातून शरीराबाहेर जाते. वाढत्या वयानुसार स्त्री बीजाची संख्या कमी होते.
- मासिक पाळी जाते म्हणजे सर्व स्त्री बीज संपते. कमी वयात असे झाल्यास त्याला प्री मॅच्युअर ओव्हरीयन फेल्युलर म्हणतात. अशा वेळी गर्भ पिशवी छोटी होते, शरीरात ओस्ट्रेजन हार्मोन कमी होऊन रजोनिवृत्तीचा परिणाम दिसू लागतो.
ज्या स्त्रियांची मासिक पाळी गेली आहे त्यांना गर्भधारणा होण्यासाठी टेस्ट ट्यूब बेबीने गर्भधारणा होऊ शकते. वय वर्षे ५० पर्यंत फिटनेस असल्यास टेस्ट टय़ूब बेबीने गर्भधारणा होऊ शकते. अशा प्रकारामध्ये औषधांचा वापर करून मासिक पाळी पुन्हा आणली जाते. गर्भ पिशवी गर्भ राहण्यासाठी सक्षम झाली का ते तपासून गर्भधारणा होऊ शकते. - डॉ. आर. एस. काटकर, आयव्हीएफतज्ज्ञ, सातारा
- मासिक पाळी जाण्याचे वय पूर्वी ४५ ते ५० होते
- मासिक पाळी जाण्याचे वय आता ४० ते ४५ झाले आहे
- अपघात किंवा आजारपणात तरुण मूल गमावणाऱ्या जोडप्यासाठी उपयुक्त