सातारा : ‘एकच मिशन-जुनी पेन्शन’ या प्रमुखसह अन्य प्रलंबित मागण्यासाठी शासकीय आणि निमशासकीय कार्यालयातील वर्ग ३, ४ मधील कर्मचारी १४ डिसेंबरपासून बेमुदत संपावर जात आहेत. यामध्ये सातारा जिल्हा परिषदेचे कर्मचारीही सहभागी होत आहेत. या अनुषंगाने मंगळवारी पूर्व तयारीचे आंदोलन झाले. यावेळी जोरदार घोषणाबाजी करत करण्यात आली. तर संपामुळे शासकीय कामकाज ठप्प होणार आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, जुनी पेन्शन योजना कर्मचाऱ्यांना लागू करावी ही मागणी अनेक वर्षांपासून आहे. तरीही शासनाकडून डोळेझाक होत आहे. यासाठी आता १४ डिसेंबरपासून राज्यभरात बेमुदत संप करण्यात येणार आहे. त्याचबरोबर या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांही करण्यात आलेल्या आहेत. यामध्ये कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित करणे, रिक्त पदे भरली जावीत, विनाअट अनुकंपा नियुक्ती करणे, कंत्राटीकरण धोरणाचे उच्चाटीकरण करणे, चतुऱ्थश्रेणी कर्मचारी आणि वाहनचालक पद भरतीवरील बंदी उठविणे.शिक्षण क्षेत्रातील दत्तक योजना, समुह शाळा योजनांद्वारे शाळांचे होणारे कार्पोरेट धार्जिणे खासगीकरण धोरण रद्द करणे, नवीन शिक्षण धाेरणाचा पुनर्विचार करणे, पाचव्या वेतन आयोगापासून वेतनत्रुटी दूर करण्यासाठी यंत्रणा स्थापित करणे, सेवानिवृत्तीचे वय ६० करावे आदी मागण्यांसाठी हा संप करण्यात येत आहे. राज्यात हा संप सुरू होणार असून सातारा जिल्ह्यातीलही शासकीय, निमशासकीय कार्यालयातील वर्ग ३ आणि ४ चे कर्मचारी सहभागी होणार आहेत. तर सातारा जिल्हा परिषदेत मंगळवारी कर्मचाऱ्यांनी जुन्या पेन्शनसह अन्य मागण्यासाठी आवाज उठवला. यामध्ये शेकडो कर्मचारी सहभागी झाले होते. तसेच १४ डिसेंबरपासून संपावर जाण्याबाबत संबंधितांना निवेदनही दिले. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या कामकाजावर परिणाम होणार आहे.
जुनी पेन्शन: साताऱ्यात कर्मचाऱ्यांची संपाची पूर्वतयारी; घोषणाबाजीने जिल्हा परिषद दणाणून सोडली
By नितीन काळेल | Published: December 12, 2023 5:22 PM