कऱ्हाड : खेळण्याचे पिस्तूल घेऊन दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीला कऱ्हाड शहर पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेऊन अटक केली. मलकापूर येथे भाजी मंडईनजीक उपमार्गावर सोमवारी पहाटे ही कारवाई करण्यात आली. या टोळीकडून एअर पिस्तूल, छर्रे, तलवार, कोयता व लोखंडी बार असे साहित्य हस्तगत करण्यात आले आहे. ही टोळी एका फायनान्सच्या येथील शाखेवर दरोडा टाकणार होती, अशी माहिती पोलीस तपासात उघडकीस आली आहे. युवराज गुलाबराव भोसले-शिरसट (वय २९, रा. मांजरे बुद्रुक, ता. हवेली, जि. पुणे), विशाल विजय सातपुते (२२, रा. हडपसर-पुणे, मूळ रा. गुढे, ता. पाटण), सागर दीपक लांडगे (१८, रा. हडपसर-पुणे) अशी पोलिसांनी अटक केलेल्यांची नावे आहेत. तर एका अल्पवयीन मुलासही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, पाठलाग करून धरपकड केली जात असताना, महेश सुभाष थोरात (रा. हडपसर-पुणे, मूळ रा. भोसगाव, ता. पाटण) हा आरोपी पोलिसांच्या तावडीतून निसटला. सध्या पोलीस त्याचा शोध घेत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक बी. आर. पाटील हे रविवारी मध्यरात्री बाराच्या सुमारास रात्रगस्त घालीत तळबीड येथे पोलीस ठाण्यात पोहोचले. त्यावेळी मलकापूर येथे महामार्गाच्या भराव पुलाखाली काहीजण दुचाकीवर संशयास्पदरीत्या थांबल्याची माहिती त्यांना मिळाली. निरीक्षक पाटील यांनी ही माहिती उपनिरीक्षक अमोल खोंडे यांना देऊन कर्मचाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना केल्या. काही वेळात निरीक्षक पाटील हे शहर पोलीस ठाण्यात आले. उपनिरीक्षक खोंडे यांच्यासह काही कर्मचाऱ्यांना घेऊन ते मलकापूरमध्ये पोहोचले. कृष्णा रुग्णालयाच्या प्रवेशद्वारानजीक जीप थांबवून पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दोन पथके तयार केली. महामार्गाच्या दोन्ही उपमार्गांवरून ही पथके पुढे गेली. भुयारी मार्गात त्यांनी संशयितांना घेरले; मात्र पोलिसांना पाहताच दुचाकी तेथेच सोडून संशयितांनी पलायन केले. त्यावेळी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांचा पाठलाग सुरू केला. शहरातील मंडई परिसरात पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले. मात्र, एकजण अंधाराचा फायदा घेत तेथून पसार झाला. ताब्यात घेतलेल्या चौघांकडे पोलिसांनी कसून चौकशी केली. त्यावेळी त्या तिघांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. संशय आल्यामुळे पोलिसांनी चौघांनाही पोलीस ठाण्यात आणले. त्यांच्याकडे पोलिसांनी कसून चौकशी केली असता, त्यांनी दरोड्याचा कट उघड केला. शहरातील चावडी चौकात एका फायनान्सच्या शाखेवर दरोडा टाकण्याचा या टोळीचा कट होता. मलकापुरात उड्डाण पुलाखाली त्याविषयीच त्यांची चर्चा सुरू होती. सोबत आणलेली शस्त्रे ती एकमेकांना देत होती. त्याचवेळी पोलिसांनी कारवाई करून आरोपींचा दरोड्याचा कट उधळून लावला. (प्रतिनिधी)भीती दाखविण्यासाठी वापरयात्रा किंवा बाजारात कोठेही फुगे फोडण्यासाठी ‘एअर गन’ मिळते. अशीच एअर गनसारखी ‘एअर पिस्टल’ पोलिसांना आरोपींकडून सापडली आहे. पोलिसांनी त्याबाबत आरोपींकडे चौकशी केली असता संबंधित ‘एअर पिस्टल’ आरोपींनी भीती दाखविण्यासाठी आणल्याचे निष्पन्न झाले. या खेळण्यातील पिस्टलसोबतच आरोपींनी तलवार व कोयताही सोबत आणला होता.
खेळण्याचे पिस्तूल घेऊन दरोड्याची तयारी
By admin | Published: September 07, 2015 9:09 PM