सातारा : सातारा आणि सोलापूर जिल्ह्यात पसरलेल्या माढा लोकसभा मतदारसंघासाठी जागावाटपापूर्वीच महायुतीकडून जोरदार तयारी असून भाजपच्या विद्यमान खासदार रणजितसिंह यांनी गोळाबेरजेस सुरूवात केली आहे. तर युतीतीलच रामराजेंनीही निवडणुकीचे मनुसबे आखले आहेत. रामराजेंच्या या खेळीमागे रणजितसिंह यांना डिवचण्याचा हेतू असू शकतो. तसेच जागावाटपात मतदारसंघ राष्ट्रवादीच्या वाट्याला आल्यास माढा काबीजचे डावपेचही असणार आहेत.लोकसभेचा माढा मतदारसंघ २००९ साली अस्तित्वात आला. सोलापूर जिल्ह्यातील माढा, सांगोला, करमाळा आणि माळशिरस तर साताऱ्यातील माण व फलटण विधानसभा मतदारसंघांचा यामध्ये समावेश आहे. पहिल्या दोन टर्म राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांनी मतदारसंघाचे नेतृत्व केले. २०१९ च्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या गडाला भगदाड पाडत भाजपच्या रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी विजय मिळवला. मागील पाच वर्षांच्या काळात मतदारसंघात अनेक उलथापालथी झाल्या. तरीही उपमुख्यमंत्री अजित पवार भाजपबरोबर आल्याने युतीची ताकद वाढली आहे. त्यामुळे मतदार संघातील विधानसभेचे सर्व सहा आमदार महायुतीचेच आहेत. महायुतीत मतदार संघावर भाजपचा दावा आहे.त्यामुळे सध्यातरी खासदार रणजितसिंह हेच भाजपचे उमेदवार असतील. पण, दुसरीकडे विजयसिंह मोहिते-पाटील यांचे पुतणे आणि भाजपचे सोलापूर जिल्हा संघटक धैर्यशील मोहिते-पाटीलही तयारीत आहेत. मोहिते-पाटील आणि खासदार रणजितसिंह यांचे राजकीय संबंधही पूर्वीसारखे नाहीत. त्यामुळे विजयसिंह मोहिते व त्यांचे पुत्र हे खासदार रणजितसिंह यांना मदत करणार का ? याबाबत साशंकता आहे. तर भाजपकडून उमेदवारी न मिळाल्यास धैर्यशील मोहिते-पाटील दुसरा डाव टाकण्याच्या तयारीत आहेत. ते शरद पवार यांच्याकडे जाऊ शकतात. असे झाले तर भाजपसाठी धोक्याची घंटा ठरू शकते. अशा स्थितीत माळशिरसचे आमदार राम सातपुते हे भाजपबरोबरच राहू शकतात. त्याचबरोबर माढ्याचे आमदार बबनराव शिंदे आणि करमाळ्याचे आमदार संजय शिंदे हे दोघे बंधू अजित पवार गटात असल्याने भाजपला अर्थात विद्यमान खासदारांना मोठी रसद मिळू शकते. पण, अजित पवार गटात असलेले विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनीही माढ्याची तयारी केली आहे.काही दिवसांपूर्वीच रामराजेंनी माढ्याचे आमदार बबनराव शिंदे यांची भेट घेऊन राजकीय चर्चा केली. या भेटीत अनेक अऱ्थ दडलेले आहेत. कारण, आमदार बबनराव शिंदे आणि त्यांचे बंधू आमदार संजय शिंदे यांनी खासदारांना दोन लाखांचे मताधिक्य देण्याची घोषणा केली होती. यातून रामराजेंनी बबनराव शिंदे यांची भेट घेणे हे खासदारांना डिवचण्याचाच भाग असू शकतो. तसेच रामराजेंसह आमदार शिंदे बंधुही एकाच गटात आहेत. त्यामुळे माढा अजित पवार गटाकडे आल्यास आपली उमेदवारी भक्कम रहावी, अशी खेळीही यामागे असू शकते. त्यामुळे रामराजे हे माढ्याच्या तयारीत असल्याचे दिसून येते. त्याचबरोबर रामराजे आणि विजयसिंह मोहिते-पाटील यांचे संबंध चांगले आहेत. यातूनही रामराजेंनी खासदारांना आणखी डिवचले आहे. त्यामुळे माढ्याचे राजकारण आणखी वेगळे वळण घेणार असलेतरी खासदारांच्या पाठीमागे माणचे आमदार जयकुमार गोरे आणि सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांची ताकद भक्कम असणार आहे हेही स्पष्ट आहे.
रामराजेंची दिशा आज ठरणार..लोकसभा निवडणुकीसाठी फलटण तालुक्यातील राजे गटाच्या कार्यकर्त्यांची भूमिका जाणून घेण्यासाठी फलटणला गुरुवारी बैठक घेण्यात आलेली आहे. यावेळी रामराजेही उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. या बैठकीत रामराजे आपली राजकीय भूमिका स्पष्ट करु शकतात. यातूनच माढ्याचे राजकीय गणित काय असणार आणि राजकीय फासे कसे पडणार याचा अंदाजही येणार आहे. त्यामुळे या बैठकीकडे माढा मतदारसंघाचेच लक्ष असणार आहे.
शरद पवार गटाचीही तयारी..महाविकास आघाडीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे माढा येणार आहे. त्यामुळे पवार यांच्या बाजुने राष्ट्रवादी युवकचे प्रदेश सरचिटणीस अभयसिंह जगताप यांनी पूर्ण तयारी केली आहे. मतदारसंघात अनेक कार्यक्रम घेऊन त्यांनी स्वत:ला चर्चेत ठेवले आहे. माण तालुक्यातील ते आहेत. त्यातच माण विधानसभा मतदारसंघात शरद पवार गटाची ताकद अधिक आहे. याचाही ते फायदा घेणार आहेत. पण, सध्या ते उमेदवारीसाठी चर्चेत असलेतरी धैर्यशील मोहिते-पाटीलही हेही भाजपकडून नसेल तर पवार गटाकडून उमेदवारीसाठी प्रयत्न करण्याच्या तयारीत आहेत. यातून उमेदवारीची माळ कोणाच्या गळ्यात पडणार हे एक कोडे आहे.