कऱ्हाड : फेब्रुवारी महिन्यात अर्थसंकल्पीय अधिवेशनात ठेवण्यात येणारं बजेट हे या सरकारकडून येणाऱ्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच तयार केले जाईल. मात्र, सध्या तरी पंतप्रधान नरेंद्र मोदींची बस आता चुकलीय, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कऱ्हाड येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केले.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राज्यभर सुरू असणारी परिवर्तन यात्रा मंगळवारी कऱ्हाडात दाखल झाली. यावेळी दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळास अभिवादन केल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत माजी मंत्री जयंत पाटील बोलत होते.
सर्वसामान्य जनता आता मोदी सरकारला कंटाळलेली आहे. कारण नुसत्या घोषणा, आश्वासने दिल्याने त्या या सरकारला पूर्ण करता आलेल्या नाहीत. महाराष्ट्रातही या सरकारबद्दल लोकांचा राग अनावर झालाय. त्यांच्या मनातून हे सरकार उतरल्याची खात्री वाटते, असेही जयंत पाटील म्हणाले.
यावेळी राष्ट्रवादीचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते धनंजय मुंढे, आमदार बाळासाहेब पाटील, जिल्हाध्यक्ष सुनील माने, सत्यजितसिंह पाटणकर, नगरसेवक सौरभ पाटील आदींची उपस्थिती होती.यावेळी जयंत पाटील म्हणाले, चोरांच्या हातात चाव्या नको, असे मुख्यमंत्री फडणवीस बोलत आहेत. त्यांनी हे बोलण्यापूर्वी त्यांच्या सोळा मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराबाबत खुलासा करावा. तसेच त्यांच्या सरकारने साडेचार वर्षांत काय दिवे लावलेत, हे मुख्यमंत्री फडणवीस यांना माहिती आहे.अजित पवार म्हणाले, या सरकारने शिक्षणाचा खेळखंडोबा मांडला आहे. भाजपची सर्व पावले ही हुकूमशाही पद्धतीची आहेत. हे सरकार नुसत्या घोषणा देण्याचं काम करतंय.
सातारा येथे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दोन्ही राजेंच्या मनोमिलनाबाबत पुढाकार घेत त्यांना एकत्रित गाडीत घेतले. त्यांच्या गाडीने स्टॉर्टर मारला आहे. गियरही टाकला आहे. आता ही गाडी कोठेही थांबणार नाही, असेही शेवटी अजित पवार यांनी दोन्ही राजेंच्या मनोमिलनाच्या प्रश्नाबाबत सांगितले.