सातारा : माढा लोकसभेसाठी वातावरण तापले असून महायुतीतील अजित पवार गटातील रामराजेंनी तयारी केली असतानाच रासपनेही स्वबळाचा नारा दिलाय. त्यामुळे भाजपसाठी माढ्यातील निवडणुकीबाबत डोकेदुखी वाढली आहे. तर आघाडीत शरद पवार गटाकडून जोरदार तयारी सुरू असलीतरी त्यांचाही उमेदवार स्पष्ट नाही. तरीही सध्या संभाव्य उमेदवारांकडून मतदारसंघात साखरपेरणी सुरू असल्याचे दिसत आहे.लोकसभा मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यानंतर २००९ पासून माढा लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात आला. यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील माढा, करमाळा, सांगोला आणि माळशिरस या चार तर साताऱ्यातील माण आणि फलटण विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. लोकसभेची निवडणूक एप्रिल महिन्यात होत असून माढा मतदारसंघातील वातावरण मागील चार महिन्यांपासून तापले आहे. महायुतीतून भाजपने तयारी केली आहे. मतदारसंघ भाजपकडेच राहण्याचे संकेत असल्याने विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी मतदारसंघात जोर वाढवला आहे. पण, त्यांच्या वाटेत युतीतील राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून काटे टाकण्याचा प्रकार सुरू आहे. विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी तर बंधू संजीवराजेंसाठी तयारी केली आहे. त्यातूनच रामराजे आणि रणजितसिंह यांच्यात चांगलेच खटके उडाले आहेत. त्यातच आता महायुतीतीलच राष्ट्रीय समाज पक्षानेही स्वबळाची भूमिका घेतलीय. पक्षाचे अध्यक्ष आणि माजी मंत्री महादेवराव जानकर यांनी नगर जिल्ह्यातील पदाधिकारी मेळाव्यात माढ्याची निवडणूक लढविणार असल्याचा इरादाच स्पष्ट केलाय. तसेच भाजप आणि काॅंग्रेसनेही बरोबर येण्यासाठी आॅफर दिली असलीतरी आम्ही स्वबळ अजमावणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे जानकर यांची भूमिका ही भाजपसाठी आणखी डोकेदुखी वाढविणारी ठरली आहे. रासप स्वबळावर लढलीतर भाजपला निवडणुकीत फटका बसू शकतो. अशावेळी आघाडीसाठी ही जमेची बाजू ठरणार आहे. त्यामुळे रासप बरोबर असणे हे महायुतीसाठीही महत्वाचे आहे. यासाठी महादेवराव जानकर यांच्या मनात नेमके काय ? हे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी समजून घेण्याची गरज आहे. कारण, माढा युतीत भाजपकडेच राहू शकतो.आघाडीत माढा मतदारसंघ राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडेच राहणार आहे. सध्या मतदारसंघातून अभयसिंह जगताप यांनी तयारी केली आहे. पण, शरद पवार यांनी त्यांना हिरवा कंदील दाखविलेला नाही. निवडणूक जाहीर झाल्यानंतरच पवार हे कोणता डावपेच आखून उमेदवारी कोणाला देणार हे समजणार आहे. कारण, भाजपमधील एक पदाधिकारीही पवार यांच्याशी संधान बांधून आहे. तरीही मतदारसंघात शरद पवार गटाची ताकद कमी आहे. माढ्यात राष्ट्रवादीतील तीन आमदार आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबर आहेत. तर इतर तिघांत दोघे भाजपचे तर एक शिवसेना शिंदे गटाचा आमदार आहे. त्यामुळे माढ्याबाबत पवार यांची रणनिती काय असणार हे लवकरच समोर येणार आहे.
२००९ ला जानकरांना एक लाख मते..रासपचे अध्यक्ष महादेवराव जानकर यांनी परभणी तसेच माढ्यातून लढण्याचे जाहीर केले आहे. यामुळे महायुतीत खळबळ उडणार आहे. पण, जानकर यांनी खरेच माढ्यात स्वत: निवडणूक लढविली तर ते लाखाच्या घरात मते घेऊ शकतात. २००९ ला माढा मतदारसंघाची पहिली निवडणूक झालेली. त्यावेळी शरद पवार यांनी प्रथम नेतृत्व केले होते. निवडणुकीत पवार यांना पाच लाखांहून अधिक मते मिळालेली. तर विरोधी भाजपचे सुभाष देशमुख यांना २ लाख १६ हजार मते मिळाली होती. तर रासपचे महादेव जानकर तिसऱ्या क्रमांकावर होते. त्यांनी एकटे लढत सुमारे ९९ हजार मते मिळविलेली. १५ वर्षांचा विचार करता रासपचं संघटन वाढलंय. त्यातच निवडणुकीत भाजपला आघाडीतूनही जोरदार टक्कर मिळू शकते. अशावेळी रासप स्वबळावर का युतीत राहणार यावरही माढ्याची निवडणुकीचे भवितव्य ठरणार आहे.