कोपर्डे हवेली (जि. सातारा) , दि. १४ : बनवडी, ता. कऱ्हाड येथे दिवाळीचे खाद्यपदार्थ बनविल्या जाणाऱ्या ठिकाणी अन्नभेसळ विभागाने छापा टाकला. पदार्थ बनविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या साहित्यांची पाहणी करून त्यांनी पंचनामा केला. पुढील कायदेशीर सोपस्कार पूर्ण करण्यासाठी मिठाई बनवणाऱ्याना साताऱ्याची वारी करण्याची सूचना अधिकाऱ्यानी दिली.
दिवाळी दोन दिवसांवर आली असून, सर्वत्रच धामधुम सुरूआहे. खरेदीसाठी बाजारपेठा फुल्ल झाल्या आहेत. दिवाळीचा सण म्हटलं की वेगवेगळे पदार्थ बनवण्यासाठीची गृहिणींची लगबग सुरू असते. मात्र, धावत्या युगामध्ये आणि विभक्त कुटुंब पद्धतीमुळे आज घरामध्ये पदार्थ बनवण्याचा कल कमी झाला आहे.
नोकरी, व्यवसाय करणाऱ्या महिलांना घरी पदार्थ बनवणे शक्य होत नाही. त्यामुळे बाजारातून दिवाळीचे तयार पदार्थ आणण्याकडे कल वाढला आहे. परिणामी, दिवाळीचे पदार्थ बनवणाऱ्यानी सध्या पदार्थ बनवण्याचा धडाका लावला असून, ते बनवताना स्वच्छतेची कसलीही काळजी घेतली जात नसल्याचे चित्र समोर येत आहे.
बनवडी येथे एका खोलीमध्ये काही दिवसांपासून चार-पाचजण मिठाई तसेच दिवाळीचे पदार्थ बनवित होते. या पदार्थ त्यांच्याकडून नामांकित मिठाई दुकाने आणि बेकरीमध्ये पुरविले जायचे. मात्र, ते बनवत असताना कसलीही स्वच्छता पाळली जात नव्हती. निघणारा कचरा किंवा घाण तिथेच टाकली जात होती.
ही अस्वच्छता पाहिल्यानंतर बनवडी येथील ग्रामपंचायत सदस्यांनी याबाबत अन्न भेसळ विभागाला माहिती दिली. त्यानुसार अन्नभेसळ विभागाचे राजेंद्र काकडे आणि त्यांच्या सहकाऱ्यानी त्याठिकाणी भेट देऊन पाहणी केली. संबंधित ठिकाणचा पंचनामा करून त्यांचा परवाना ताब्यात घेण्यात आला. कायदेशीर कार्यवाही पूर्ण होईपर्यंत पदार्थ बनविण्यास त्यांना मनाई करण्यात आली.