नागठाणे : नागठाणे आणि परिसरात गेले तीन आठवडे दडी मारलेल्या पावसाने दोन दिवसांत पुन्हा उभारी घेतल्याने भागातील बळीराजा सुखावला आहे. मागील दोन आठवड्यात संपूर्ण नागठाणे (ता. सातारा) भागात माॅन्सून पावसाने अचानकपणे दडी मारल्यामुळे भागातील बळीराजास मोठ्या प्रमाणात चिंता सतावत होती.
संपूर्ण दोन आठवड्यांत वरुणराजाकडून कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद न मिळाल्यामुळे भागातील बळीराजा आभाळाकडे डोळे लावून बसला होता. संपूर्ण नागठाणे भागातील काशीळ, निसराळे, खोडद, अतीत, माजगाव, नागठाणे, निनाम, पाडळी, सोनापूर, मांडवे, सासपडे, नागठाणे, बोरगाव, भरतगाववाडी, भरतगाव तसेच वळसे आदी गावांतील बळीराजा खरीप हंगामातील सोयाबीन, भुईमूग, मका, कडधान्ये पेरणीची कामे पूर्ण करून त्यानंतर कोळपणीची कामे हाती घेऊन वरुणराजाच्या प्रतीक्षेत आभाळाकडे डोळे लावून बसला होता. संपूर्ण दोन आठवडे पावसाचा कसलाही प्रतिसाद न मिळाल्यामुळे भागातील बळीराजा पिकांच्या दुबार पेरणीच्या चिंतेने पूर्णपणे व्याकूळ झाला होता. सद्य:स्थितीत या दोन दिवसांत माॅन्सून पावसाने चांगलीच हजेरी लावून संपूर्ण शेतशिवारातील जमीन पाणी पाणी केल्यामुळे भागातील बळीराजाची चिंता दूर झाली असल्यामुळे बळीराजा सुखावला आहे.
कोट..
गेले तीन आठवडे पावसाचा कोणताही ठावठिकाणा नसल्यामुळे पिके उन्हाच्या गरमीने सुकून खरिपाच्या दुबार पेरणीचे संकट चेहऱ्यासमोर स्पष्टपणे जाणवत होते. त्यामुळे आभाळाकडे डोळे लावून बसण्याशिवाय अजिबात पर्याय नव्हता; परंतु येत्या दोन दिवसांत माॅन्सून पावसाने पुन्हा एक वेळ चांगली उभारी घेतल्याने उगवणारी पिकांची होणारी ससेहोलपट वाचली आणि पीकवाढीस चांगली चालना मिळाली.
-विनोद बर्गे, शेतकरी