मायणी : मायणीसह परिसरात सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. सुमारे अर्धा ते पाऊण तास झालेल्या मध्यम व हलक्या पावसाच्या सरी पेरणीसाठी व पिकांसाठी पोषक आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
जूनच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या पावसानंतर अनेक शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या होत्या. त्यानंतर पावसाने थोडी विश्रांती घेतली होती. त्यामुळे पेरणी केलेले शेतकरी व पूर्ण पावसावर अवलंबून शेती करणारे शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागलेले होते, तर पावसाने उघडीप दिलेल्या काळामध्ये शेतकऱ्यांनी बहुतांशी शेतकऱ्यांनी पेरणीही उरकून घेतली होती.
धोंडेवाडी, सूर्याचीवाडी, कलेढोण, पाचवड, विखळे व मायणी परिसरामध्ये सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. सुमारे अर्धा ते पाऊण तास सर्वत्र पावसाच्या मध्यम ते हलक्या सरी पडल्या. पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी झाल्याने रस्त्याच्या कडेला व सखल भागांमध्ये पाणीसाठा निर्माण झाला तर या पावसाने शेतकरीवर्गामध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
भुईंजलाही झोडपले
वाई तालुक्यातील भुईंज, पाचवड परिसरातही सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास तासभर झोडपून काढले. यामुळे पुणे-बंगळोर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक संथगतीने सुरू होती. मात्र काही किलोमीटर अंतरावर गेल्यानंतर पाऊस गायब झालेला वाहनचालकांना अनुभवास मिळत होते. दुचाकीस्वारांचे मात्र हाल झाले. काही जणांनी सेवा रस्त्यावरील झाडाखाली, भुयारी मार्गात थांबणे पसंत केले.