लोकमत न्यूज नेटवर्क
अंगापूर
परिसरात मंगळवारी ढगांच्या गडगडाटासह पावसाने हजेरी लावली. यामुळे काही काळ हवेत गारवा निर्माण झाला होता. पाऊस सुरू होताच नेहमीप्रमाणे वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे घरात असणाऱ्या लोकांना घामाच्या धारा, तर घराबाहेरील लोकांना गारवा असेच काहीसे वातावरण निर्माण झाले होते.
गेली पाच ते सहा दिवसांपासून परिसरात ढगाळ वातावरण तयार होत होते. यामुळे सकाळपासून दुपारपर्यंत उन्हाचा तडाखा, तर दुपारनंतर ढगाळ वातावरण असेच चित्र निर्माण होत होते. मात्र मंगळवारी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर दुपारी चारच्या सुमारास ढगांच्या गडगडाटासह पावसाने हजेरी लावली. यामुळे उभारलेल्या गुढ्या खाली घेण्यासाठी अनेकांची तारांबळ उडाली होती. पावसाच्या हजेरीने हवेत गारवा निर्माण झाला. दरम्यान, वीजपुरवठा खंडित झाल्याने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व गुढीपाडव्याच्या सणामुळे घरातच असणाऱ्या नागरिकांना घामाच्या धारा तर घराबाहेर गारवा असेच वातावरण निर्माण झाले आहे.