कऱ्हाड तालुक्यात गत काही दिवसांपासून उष्णतेचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. कडक ऊन आणि उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. अशातच दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण तयार होत होते. जिल्ह्याच्या इतर भागात वळीव पावसाने हजेरी लावली. मात्र, कऱ्हाड तालुक्याला पाऊस हुलकावणी देत होता. मंगळवारी दुपारी मात्र अचानक पावसाला सुरुवात झाली. प्रारंभी पावसाच्या हलक्या सरी कोसळत होत्या. अचानक वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट सुरू झाला. पावसाचा जोर वाढला. अवघ्या काही मिनिटात सर्वत्र पाणीच पाणी झाले. अचानक सुरू झालेल्या या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. रस्त्यानजीक भाजीपाला विकणाऱ्यांनी आपले साहित्य गोळा करून निवारा शोधला, तर काहीजणांचे साहित्य भिजून नुकसान झाले.
ऊन्हाळी पिकांसाठी हा पाऊस पोषक ठरणारा आहे. सध्या शेतकऱ्यांनी टोमॅटोसह इतर पिकांची लागण केली आहे. कडक उन्हामुळे ही पिके पिवळी पडून कोमेजली होती. मात्र, मंगळवारी दुपारी झालेल्या पावसाने या पिकांना जीवदान मिळणार आहे.
- चौकट
वीजपुरवठा खंडित
वादळी वाऱ्यासह पावसाने सुरुवात केल्यानंतर कऱ्हाड शहरासह परिसरातील काही गावांमधील वीजपुरवठा खंडित झाला. उशिरापर्यंत हा पुरवठा सुरळीत झाला नव्हता. वादळी वाऱ्यामुळे काही ठिकाणी तांत्रिक बिघाड झाल्याचे वीज वितरणकडून सांगण्यात आले. बिघाड दुरुस्त करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते.
फोटो : १३केआरडी०४
कॅप्शन : कऱ्हाडला मंगळवारी दुपारी अवकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे नागरिकांना उकाड्यात दिलासा मिळाला.