कराड : ‘लोकनेते विलासराव पाटील यांच्या कृतीशील विचारांचा वारसा विविध उपक्रमातून यापुढेही जोपासला जावा. त्यांचे विचार जोपासणे हीच त्यांच्या स्मृतींना श्रद्धांजली ठरेल,’ असे आवाहन साधना साप्ताहिकाचे संपादक विनोद शिरसाट यांनी केले.
कराड येथे माजी सहकारमंत्री दिवंगत विलासराव पाटील उंडाळकर यांच्या ८३ व्या जयंती कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी रयत सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष ॲड. उदयसिंह पाटील, इंद्रजित चव्हाण, सह्याद्री बँकेचे अध्यक्ष पुरुषोत्तम माने, गणपतराव कणसे, शेती उत्पन्न बाजार समितीचे सभापती महादेव देसाई यांची प्रमुख उपस्थिती होती.
शिरसाट म्हणाले, ‘विलासरावांनी ५० ते ५५ वर्षे राजकारण, समाजकारण करताना काही तत्त्वे जोपासली ती शेवटपर्यंत त्यांनी पाळली. काँग्रेस विचार धारेचा प्रभाव त्याच्यावर शेवटपर्यंत कायम होता. तो प्रभाव त्यांनी कृतीतूनही सिद्ध केला. सहकार, समाजकारणात आदर्श निर्माण करताना त्यांनी वैचारिक अधिष्ठान वाढवण्यासाठी केलेले काम राज्यात आदर्शवत असे आहे. आदर्श व वास्तव विचार पुढे घेऊन जाणाऱ्या मोजक्या मंडळीत त्यांचे स्थान अढळ होते. त्यांच्या जाण्याने राजकारण, समाजकारण चळवळीचेच नव्हे तर कृतीशील समाज रचना निर्मिती कार्य करणाऱ्या चळवळीची ही मोठी हानी झाली आहे. यापुढील काळात उदयसिंह पाटील व रयत संघटनेने त्यांचे विचार पुढे घेऊन जाण्याचे काम करावे,’ असेही आवाहन शिरसाट यांनी केले.
यावेळी दिवंगत लोकनेते विलासराव पाटील उंडाळकर यांनी मतदारसंघात केलेल्या चौफेर विकासाबरोबर समाजात केलेले समाजप्रबोधन याची चित्रफीत दाखविण्यात आली. ही चित्रफीत पाहत असताना उपस्थितांच्या डोळ्याच्या कडा पाणवल्या.
कार्यक्रमास कोयना दूध संघाचे अध्यक्ष वसंतराव जगदाळे, धनाजीराव काटकर, बाबुराव शिंदे, रफिक बागवान, राजेंद्र शेलार, कोयना बँकेचे अध्यक्ष रोहित पाटील, कराड खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष रंगराव थोरात, बाजार समितीचे उपसभापती विजयकुमार कदम, श्यामराव पाटील नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष ब. ल. पाटील यांच्यासह तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. प्रास्ताविक व स्वागत माजी प्राचार्य गणपतराव कणसे यांनी केले. अशोक पाटील-पोतलेकर यांनी सूत्रसंचालन केले. शेती उत्पन्न बाजार समितीचे सभापती महादेव देसाई यांनी आभार मानले.
फोटो : १६ विलासराव उंडाळकर
कराड येथे दिवंगत विलासराव पाटील यांच्या जयंती कार्यक्रमात विनोद शिरसाट यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी उदयसिंह पाटील-उंडाळकर, इंद्रजित चव्हाण, गणपतराव कणसे व मान्यवर उपस्थित होते.