कराड: यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. पण राजकीय वर्तुळात ती वेगळ्याच कारणाने चर्चेची ठरली. ते कारण म्हणजे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, सोनहिरा साखर कारखान्याचे अध्यक्ष, आमदार मोहनराव कदम यांची व्यासपीठावरील हजेरी! त्यावेळी डॉ. अतुल भोसले यांनी त्यांचा सत्कारही केला. आता हा 'सत्कार' भविष्यात 'सत्कारणी' लागणार का? याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.दिवंगत डॉ. यशवंतराव मोहिते व डॉ. पतंगराव कदम यांच्यातील गुरु शिष्याचे नाते सर्वश्रुत आहे. त्यामुळे यशवंतराव मोहिते व जयवंतराव भोसले यांच्या राजकीय संघर्षात पतंगराव कदम नेहमीच मोहितेंच्या बरोबर राहिल्याचा इतिहास आहे. त्यांची पुढील पिढीही त्याच वाटेवरून जाताना आजवर पाहायला मिळाले आहे.सुमारे दिड वर्षापूर्वी कृष्णा सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक झाली. यात डॉ. इंद्रजीत मोहिते, डाँ. सुरेश भोसले व अविनाश मोहिते यांनी पॅनेल ठाकले होते. त्यावेळी तत्कालीन मंत्री विश्वजीत कदम यांनी स्वतः मैदानात उतरत डॉ. इंद्रजीत मोहिते यांच्यासाठी कृष्णाकाठ पिंजून काढला होता. पण नुकत्याच झालेल्या कारखाना सभेला विश्वजीत कदम यांचे चुलते आमदार मोहनराव कदम थेट व्यासपीठावरच विराजमान झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. आता याबाबत उलट सुलट चर्चा झाल्या नाही तर नवलच!
त्यांनी तर व्यासपीठावरच हजेरी लावली!कारखान्याच्या सभेला आले म्हणून काय झाले ?असा प्रश्न काहीजण करतील. पण कृष्णेच्या इतिहासात आजवर पाहिले तर विरोधक बाहेर असणाऱ्या नोंदणी कक्षात सही करून हजेरी लावण्याचे काम करतात. पण मोहनराव कदम यांनी तर व्यासपीठावरच हजेरी लावली. त्यामुळे नेमकं चाललयं तरी काय? असा प्रश्न सामान्य कार्यकर्त्यांना पडणारच.
म्हणे समीकरण बदलले आहे!आमदार मोहनराव कदम व्यासपीठावर बसल्यानंतर डॉ.अतुल भोसले व त्यांच्यात बराच वेळ काहीतरी बोलणे चालले होते. नेमकी चर्चा काय? हे माहित नाही. मात्र त्यानंतर सभेत बोलताना डॉ. अतुल भोसले म्हणाले, आता समीकरण बदलले आहे. आमदार मोहनराव कदम सभेला आले आहेत. त्यांनी यापुढे सहकार्य करतो असे आश्वासन दिले आहे. आणि ते नक्की आश्वासन पाळतील असा मला विश्वास आहे. असे म्हणताच उपस्थितांनी त्याला टाळ्या वाजवून प्रतिसाद दिला.
सगळेच फासे जुळून येत आहेत!जिल्हा बँक निवडणुकीला डॉ. अतुल भोसले यांनी राष्ट्रवादीचे नेते आमदार बाळासाहेब पाटील यांना केलेल्या मदतीमुळेच त्यांचा विजय सुकर झाला. आता काँग्रेसचे आमदार मोहनराव कदम यांनी कारखाना सभेला व्यासपीठावर लावलेली हजेरी पाहता सगळेच फासे भोसलेंना जुळून येत आहेत असे कार्यकर्त्यांना वाटू लागले आहे.