सातारा : जिल्हा पोलीस दलातील पोलीस मुख्यालयात महिला अत्याचार प्रतिबंध शाखेमध्ये कार्यरत असलेले सहायक पोलीस निरीक्षक गणेश जगन्नाथ म्हेत्रस यांना उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला जाहीर करण्यात आले आहे. राष्ट्रपती पदकाने त्यांचा दुसऱ्यांदा सन्मान होत असून त्यांच्यावर पोलिसांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हेत्रस यांची ३२ वर्षे सेवा झाली असून २००८ साली त्यांना पोलीस महासंचालकांकडून सन्मान चिन्ह प्रदान करुन गौरवण्यात आले होते. तर २००६ मध्ये देखील त्यांनी पोलीस सेवेत केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना राष्ट्रपती पोलीस पदकाने सन्मानित करण्यात आले आहे.
म्हेत्रस मूळचे महिमानगड, ता. माण गावचे रहिवाशी आहेत. कायदा, सुव्यवस्था, आंदोलने तसेच कोरोना प्रादुभार्वाच्या काळात केलेल्या उल्लेखनीय सेवेची दखल घेत त्यांना २०२० चे राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर करण्यात आले आहे.
स्वातंत्र्यदिनी जिल्हा पोलीस दलाला मिळालेली ही खास भेट असून लवकरच राज्यपालांच्या हस्ते त्यांना हे पदक प्रदान करुन सन्मानित करण्यात येणार आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अपर जिल्हा पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांच्यासह पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कौतुक केले.