सातारा: जिल्ह्यात सध्या कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने कोरोना चाचणी करणाऱ्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांवर अगोदरच प्रचंड ताण आहे, असे असतानाच आणखी एका समस्येला त्यांना तोंड द्यावे लागत आहे. अनेकांना प्रवासासाठी आणि कामावर पुन्हा हजर राहण्यासाठी कोरोना टेस्ट गरजेची असते. ही टेस्ट तातडीने करून मिळावी म्हणून डॉक्टरांवर दबाव आणला जात असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. यामुळे डॉक्टर हतबल झाले असून, संबंधिताविरोधात आवाज उठवायचा की, चाचण्यांचा वेग वाढवायचा, असा प्रश्न त्यांच्यासमोर आ वासून उभा आहे.
जिल्ह्यात सध्या कोरोनाने अक्राळ-विक्राळ रूप धारण केले आहे. रोज दीड हजारहून अधिक बाधित रुग्ण आढळून येत आहेत. या सर्वांची कोरोना चाचणी करण्याची जबाबदारी जिल्हा शासकीय रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांवर आहे. गत सहा महिन्यांपासून हे सर्व कर्मचारी रात्रंदिवस कोरोना चाचण्या करत आहेत. त्यामुळेच लोकांपर्यंत बाधितांचे आकडे समजत आहेत. एकीकडे जास्तीत जास्त कोरोना चाचण्या करून लोकांना मरणाच्या दाढेतून वाचवण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू असतानाच डॉक्टरांना नव्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. अनेक जणांचे फोन डॉक्टरांना येत आहेत. टेस्ट तातडीने करून द्यावी, अशी मागणी त्यांच्याकडे केली जात आहे. अनेकांना प्रवासासाठी ही टेस्ट आवश्यक असते, तर काही जणांना सुट्टीवरून परत कामावर हजर होण्यासाठी आवश्यकता असते. त्यामुळे हे लोक तातडीने कोरोना चाचणी करून मिळावी म्हणून डॉक्टरांवर दबाव आणत आहेत. अगदी मंत्रालयापासून ते स्थानिक नेत्यांचे डॉक्टरांना फोन येत आहेत. जर तातडीने चाचणी केली नाही तर वारंवार त्यांना फोन केले जात आहेत. त्यामुळे डॉक्टर हतबल झाले आहेत. इतर रॅपिड टेस्ट, rt-pcr टेस्ट. या टेस्ट करण्यास यामुळे उशीर होत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. संबंधिताविरोधात आवाज उठवला तर सगळा वेळ त्यांना तोंड देण्यास जाईल, परिणामी कोरोना चाचण्या करण्यास उशीर होईल. त्यामुळे डॉक्टर तोंड दाबून बुक्क्याचा मार सहन करत असल्याचे दिसून येत आहे.
दोन दिवसांपूर्वी असाच एका नेत्याचा फोन डॉक्टरांना आला. कोणत्याही परिस्थितीत आमच्या रुग्णाला तातडीने टेस्ट करून द्या, असं सांगण्यात आले. मात्र कोरोना चाचणीसाठी बाहेर भली मोठी रांग लागली होती, असे असतानाही संबंधित व्यक्तीला त्यांना नाइलाजास्तव आतमध्ये घ्यावे लागले. अशा प्रकारचे कितीतरी फोन रोज येत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
चौकट : टेस्ट बोगस द्यायचं एवढंच राहिलं होतं
पुण्यामध्ये बोगस चाचण्या करणाऱ्या टोळीला नुकतीच अटक करण्यात आली होती. ही टोळी प्रवासासाठी आणि कामावर हजर राहण्यासाठी लोकांना निगेटिव्ह टेस्ट देत होती. मात्र साताऱ्यात या उलट परिस्थिती असून बोगस टेस्ट द्या हे सांगितले जात नसले तरी टेस्ट लवकर करून द्या हे सांगण्यात येत असल्यामुळे डॉक्टरांना मोठा दिलासा मिळाला आहे.