सातारा: वर्षानुवर्षे जमिनीवरून वाद सुरू असलेल्या विरोधकांना अडकविण्यासाठी सख्ख्या बहिणीच्या खुनाचा सख्ख्या भावाने पत्नीला सोबत घेऊन बनाव केल्याचे तपासात उघड झाले. याप्रकरणी पोलिसांनी फलटण तालुक्यातील अलगुडेवाडी येथील आठ जणांना अटक केली आहे.पिंपद्र, ता. फलटण येथे तीन दिवसांपूर्वी महुली झबझब पवार (वय ६०) या महिलेचा पाच ते सहा जणांनी झोपडी जाळून खून केला होता. हा प्रकार जमिनीच्या वादातून झाला असल्याची तक्रार महुली पवार यांची भावजय कल्पना पवार (वय ४५) हिने फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली होती. यावरून पोलिसांनी सहा जणांना अटकही केली. मात्र, अटक केलेल्या संशयित आरोपींकडून पोलिसांना मिळत गेलेल्या माहितीवरून यात नक्कीच काहीतरी काळेबेरे असल्याची कुणकुण स्थानिक गुन्हे शाखेला लागली.
सहायक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे यांच्यासह त्यांच्या टीमने सलग तीन दिवस फलटण येथे तळ ठोकून या खून प्रकरणाचे गूढ अखेर उलगडले. हा सारा प्रकार तपासी अधिकाऱ्यांना समजला तेव्हा अधिकारीही आवाक झाले. महुली पवार ही गेल्या अनेक वर्षांपासून भाऊ अशोक पवार याच्याकडे राहात होती. महुलीचे वयही झालंय. तिचा काही उपयोग नाही. आपण तिला ठार मारले तर याचा आळ आपण जमिनीचा वाद सुरू असलेल्या विरोधकांवर घेऊ आणि त्यांना जेलमध्ये पाठवू. असा भयानक कट महुलीचा भाऊ अशोक आणि भावजय कल्पना हिने रचला. त्या दिवशी महुलीला रानातील झोपडीत नेले.
सायंकाळी साडेसातच्या सुमारास माहुलीच्या डोक्यात भावजय कल्पना हिने दगड घालून तिचा खून केला. त्यानंतर पेट्रोल ओतून तिच्यासह झोपडीला आग लावली. एवढेच नव्हे तर घरातल्या मुलासकट सर्वांनीच स्वत: मारहाणीच्या खुणा दिसाव्यात म्हणून शरीरावर ओरखडे ओढले. एखादा चित्रपटाला शोभेल असा बनाव या कुटुंबाने केला आणि विरोधकांना अडकविण्यासाठी सख्ख्या भावाने बहिणीचा बळी दिला. पण चाणाक्ष पोलिसांनी दुसऱ्यांना खड्डा खणण्यास गेलेल्या भाऊ, भावजय, मुले अशा आठ जणांना गजाआड केले.
पोलिसांनी यातील वस्तुस्थिती समोर आणली नसती तर आठ जणांना नाहक कारागृहात दिवस काढावे लागले असते. हा तपास कौशल्याने उघडकीस आणल्याने पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांनी एलसीबी टीमचे कौतुक केले.खून नाही केला तरीही ते कारागृहात...भावजय कल्पना पवार हिने आपल्या नणंदेचा खून सहा जणांनी केला असून, त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी केली होती. खुनासारखी गंभीर घटना घडल्यानंतर पोलिसांनी आठही जणांना तत्काळ अटक केली. मात्र, यातील वस्तूस्थिती समोर आल्यानंतर अटक केलेले सर्वजण निर्दोष निघाले. पण विनाकारण त्यांना जेलची हवा खावी लागली. आता त्यांच्यावरील खुनाचा आरोप मागे घेण्यासाठी स्वत: पोलीसच न्यायालयात अहवाल पाठविणार आहेत. त्यानंतरच त्यांची यातून सुटका होणार आहे. खुनाचा बनाव करणारे हेच ते...कल्पना अशोक पवार, अशोक झबझब पवार, कमांडो उर्फ किमाम अशोक पवार, गोप अशोक पवार, विशाल अशोक पवार, रोशनी रासोट्या काळे, काजल उर्फ नेकनूर पोपट पवार, मातोश्री ज्ञानेश्वर पवार (सर्व रा. अलगुडेवाडी, ता.फलटण) यांनी वृद्ध महुली पवार हिच्या खुनाचा बनाव रचला. सारे पुरावे या आठ जणांच्या विरोधात पोलिसांना भक्कम मिळाले असून, त्यांना कठोर शिक्षेपर्यंत पोहोचविण्यासाठी पोलीस प्रयत्न करणार आहेत.