कुडाळ : जावळी तालुक्यातील कुडाळ येथील अंगणवाडीला पुरविण्यात आलेल्या पोषण आहारात चक्क प्लास्टिक तांदूळ असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात आला आहे. या तांदळाचा भात खाल्ल्याने मुलांना पोटदुखीचा त्रास झाला असून, मुलांच्या जिवाशी खेळणाऱ्या पुरवठादार ठेकेदारावर कारवाई करावी, अशी मागणी पालकांमधून केली जात आहे.
कुडाळच्या इंदिरानगर येथील महिलांनी पोषण आहारातील तांदूळ शिजत नसल्याचे तसेच व तो चावला जात नसल्याची बाब माजी सरपंच वीरेंद्र शिंदे यांच्या निदर्शनास आणून दिली. यानंतर सरपंच शिंदे यांनी पॅकिंग तांदळाची पिशवी फोडली असता यात फायबरसदृश प्लास्टिक तांदूळ असल्याचे दिसून आले. या प्रकरणाची संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने दखल घ्यावी तसेच निकृष्ट दर्जाचा तांदूळ व डाळींची तपासणी करून पुरवठादारांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली.
(कोट)
शासनाकडून अंगणवाडीतील विद्यार्थी व गरोदर मातांना पुरविण्यात येणारा आहार अतिशय निकृष्ट दर्जाचा असून, हा बालकांच्या जीविताशी खेळण्याचा प्रकार आहे. हा फायबरसदृश तांदूळ असल्याचे निदर्शनास आले असून, डाळ, मीठ आदी साहित्यही निकृष्ट आहे. तालुकाभर असा भेसळयुक्त आहार वितरित झाला आहे. पुरवठादारावर तात्काळ कारवाई व्हावी, अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल.
- वीरेंद्र शिंदे, माजी सरपंच, कुडाळ