सागर गुजर ।सातारा : घर खरेदी व्यवहारातील जीएसटीचा भार मोठ्या प्रमाणावर खरेदी झाला असल्याने आता सर्वांचेच घर खरेदीचे स्वप्न पूर्ण होण्याची चिन्हे आहेत. जीएसटीच्या कपातीच्या निर्णयामुळे गेल्या तीन वर्षांपासून मंदीच्या चक्रात अडकलेल्या जिल्ह्यातील बांधकाम व्यवसायालाही ‘अच्छे दिन’ येणार आहेत.
गेल्या तीन वर्षांपूर्वी घर खरेदीवर १२ टक्के इतका मोठा वस्तू व सेवा कर (जीएसटी) लावण्यात आला होता. या करामुळे घर खरेदीचे व्यवहार मंदावले होते. बांधकाम व रियल इस्टेटचे व्यवसाय अक्षरश: अखेरच्या घटका मोजत होते. गेल्या तीन वर्षांमध्ये सातारा शहरात नवीन प्रकल्पही उभारण्यात आला नव्हता. केवळ तयार फ्लॅट विक्री करण्यावर व्यावसायिकांनी भर दिला होता. आता जीएसटी कर १२ टक्क्यांवरून ५ टक्के करण्यात आला. ७ टक्के करातील मोठी बचत होणार असल्याने घर खरेदीकडे आता लोक मोठ्या प्रमाणावर वळतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू झाला होता, तरीही जीएसटीमुळे घरात पैसे गुंतवण्याची इच्छा कमी झाली होती. आता ही गुंतवणूक वाढण्यास मदत होणार आहे. आता नवीन बांधकाम प्रकल्प उभे राहतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, बांधकाम व्यवसायातील मंदीमुळे या व्यवसायावर अवलंबून असणारे लोक इतर मजुरीची कामे करून उदरनिर्वाह चालवत होते. बांधकाम व्यवसायात मजुरी मोठी आहे, तसेच दर आठवड्याला ती हातात पडते. यातून कुटुंबाचा उदरनिर्वाह चांगल्या पद्धतीने चालवता येतो, हा अनुभव असणारे बेरोजगार पुन्हा बांधकाम व्यवसायाकडे वळतील. वीटभट्टी, डबर, वाळू, खडी, वाहतूक व्यवसाय, खुदाई करणारे मजूर या सर्वांनाच जीएसटी कपातीच्या निर्णयामुळे चांगले दिवस येणार आहेत.
किती वाचणार पैसे?घर खरेदीमध्ये जीएसटी कर १२ टक्के इतका होता. साहजिकच एक लाखासाठी १२ हजार मोजावे लागत होते. २० लाखांचे घर घ्यायचे झाल्यास त्यासाठी तब्बल २ लाख ४० हजार रुपये इतका जीएसटी घर खरेदी करणाऱ्याच्या मानगुटीवर बसत होता. आता यामध्ये तब्बल १ लाख ४० हजारांची बचत होईल. परवडणाऱ्या घरांच्या खरेदीसाठी अवघा १ टक्का इतका नगण्य जीएसटी कर आकारण्यात येणार आहे.
जीएसटी कर कपातीच्या निर्णयामुळे बांधकाम व्यवसायातील मंदी उठेल. असंख्य बेरोजगार लोकांच्या हाताला आता काम मिळून बेरोजगारी दूर होईल. बांधकाम व्यवसायात मुळातच अशिक्षित अथवा अल्पशिक्षित लोक कामे करत असतात, अशा लोकांना जीवन जगण्याची नवी आशा निर्माण झाली आहे.- सयाजी चव्हाण, अध्यक्ष, बिल्डर्स असोसिएशनजीएसटी करातील कपातीमुळे बांधकाम व्यवसायाला चांगला बुस्टर मिळेल. तीन वर्षे सततची मंदी या निर्णयामुळे दूर होईल. जीएसटी १२ टक्के होता, त्यामुळे सुरू असलेल्या बांधकामात गुंतवणूक होत नव्हती. तयार घर घेण्यावर लोकांचा भर होता. मार्केट सुधारायला मदत झाली असून, सर्वसामान्यांसाठी परवडणाऱ्या घरांवर अवघा १ टक्का जीएसटी केल्याने निश्चितच लोकांच्या घराचे स्वप्न आता पूर्ण होईल.- श्रीधर कंग्राळकर, बांधकाम व्यावसायिक