सातारा : लाचलुचपत खात्याला सहकार्य करणारे तसेच तक्रार दिल्यानंतर मोठ्या दबावानंतरही आपली साक्ष न फिरविणाऱ्या तक्रारदारांचा गौरव शुक्रवारी लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात करण्यात आला. यावेळी गेल्या तीन वर्षांतील पंचवीसहून अधिक तक्रारदार उपस्थित होते. अनेकांनी यावेळी आपले मनोगतही व्यक्त केले.जिल्ह्यात या आठवड्यात दक्षता जनजागृती सप्ताह आहे. या पार्श्वभूमीवर विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, लाच देणे आणि घेणे कायद्याने गुन्हा असल्याचे वारंवार स्पष्ट करण्यात येत आहे. यावेळी पोलीस उपअधीक्षक श्रीहरी पाटील यांनी तक्रारदारांना कोणत्या अडचणी आहेत का, याची विचारणा करण्याबरोबरच ज्यांनी दबाव आणला आहे, त्यांना नोटीस बजावणार असल्याचेही यावेळी स्पष्ट केले.ज्या तक्रारदारांमुळे लाच घेणारांना अटकाव करण्यात आला, त्या तक्रारदारांच्या नेमक्या समस्या काय आहेत, त्यांना कोणी लाचखोर त्रास देतो का, अथवा जे साक्षीदार आहेत, त्यांना साक्ष फिरविण्यास सांगण्यास येत आहे का या अनुषंगाने गौरव करण्यात आला. (प्रतिनिधी)
लाचखोरांना पकडून देणाऱ्यांचा गौरव
By admin | Published: October 31, 2014 11:15 PM