सातारा : केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण-२०१८ स्पर्धेत राज्यातील सातारा जिल्ह्याने बाजी मारत देशात प्रथम क्रमांक पटकाविला. गांधी जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सातारा जिल्ह्याला सन्मानित करण्यात आले.राष्ट्रपती भवनातील सांस्कृतिक सभागृहात केंद्रीय पेयजल व स्वच्छता मंत्रालयाच्या वतीने महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय स्वच्छता परिषदेचे आयोजन करण्यात आले. या परिषदेच्या समारोपीय कार्यक्रमात स्वच्छ सर्वेक्षण-ग्रामीण २०१८ पुरस्काराचे वितरण झाले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, संयुक्त राष्ट्र संघाचे महासचिव एंटोनियो गुटेरेश, परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज, केंद्रीय पेयजल व स्वच्छता मंत्री उमा भारती, केंद्रीय शहरी व गृहनिर्माण मंत्री हरदिपसिंग पुरी, केंद्रीय दूरसंचार मंत्री मनोज सिन्हा आणि केंद्रीय पेयजल व स्वच्छता राज्य मंत्री रमेश जिगाजीनागी मंचावर उपस्थित होते.राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे अप्पर मुख्य सचिव श्यामलाल गोयल कार्यक्रमात सहभागी झाले. यासह कार्यक्रमास ६८ देशांतील प्रतिनिधी उपस्थित होते.सातारा जिल्ह्यातील १६ गावांची केंद्रीय समितीमार्फत तपासणी करण्यात आली. तपासणी घटकांमध्ये प्रामुख्याने गावरस्त्यावरील शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे, बाजारस्थळे, धार्मिक ठिकाणांची शौचालय उपलब्धता त्यांचा वापर तसेच सार्वजनिक परिसरांची स्वच्छता याची तपासणी करण्यात आली. यासाठी केंद्रशासनाने कंतार या त्रयस्थ संस्थेकडून परीक्षण करण्यात आले . यानुसार एकूण शंभर गुण ठरविण्यात आले. यात संख्यात्मक व गुणात्मक आधारावर सेवास्तर प्रगतीचे ३५ गुण व ग्रामस्थांच्या प्रतिसादाचे ३५ गुण व थेट परीक्षणाचे ३० गुण याद्वारे अंतिम गुण ठरविण्यात आले. सर्व निकषांवर सातारा जिल्हा सरस ठरला असून, जिल्ह्याने देशात सर्वाधिक गुण मिळविले आहेत.पंतप्रधान यांच्या हस्ते सातारा जिल्ह्याला गौरविण्यात आले. सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर म्हणाले, या स्वच्छ अभियानामध्ये विविध शासकीय विभागाने, तसेच महिलांनी मोठी जबाबदारी पार पाडली.
दिल्लीत पंतप्रधानांच्या हस्ते सातारा जिल्ह्याचा गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 03, 2018 12:05 AM