सातारा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कऱ्हाड येथे होणारी सभा दि. २९ रोजी होणार आहे. तसेच यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही उपस्थिती राहणार आहेत. सातारा लोकसभा मतदार संघातून १ लाख लोक जमतील, असे उद्दिष्ट ठेवून नियोजन करण्यात येत आहे, अशी माहिती पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी दिली.सातारा येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रराजे भोसले, नितीन पाटील, अतुल भोसले, धैर्यशील कदम, मनोज घोरपडे, पुरुषोत्तम जाधव, अशोक गायकवाड आदी उपस्थित होते.शंभुराज देसाई म्हणाले, दि. २९ तारखेला दोन्ही मुख्यमंत्री येण्यासाठीही प्रयत्न करण्यात येणार आहे. महायुतीचे चारही आमदार व सर्व पदाधिकारी सभेच्या तयारीला लागले आहे. स्वत:च्या विधानसभेला जसे काम केले, त्याचपद्धतीने मकरंद पाटील यांची सर्व यंत्रणा पूर्ण ताकदीने काम करत असल्याचा निर्वाळा देसाई यांनी दिला. शरद पवार यांच्या जिल्ह्यात तीन सभा होत आहेत. याचा काय परिणाम हाेऊ शकतो, काय असा प्रश्न छेडला असता त्यांनी सौ सुनार की तो एक लोहार की, असे सांगत त्याचा काही परिणाम होणार नसल्याचे सांगितले.महायुतीत सर्वजण मनाने एकत्र आल्याचे दिसत नसल्याचे विचारले असता देसाई म्हणाले, आम्ही तना-मनाने एकत्र आलो आहोत. अर्ज भरल्यानंतर चारही आमदारांनी शब्द दिला आहे. शब्द देऊन मागे आम्ही फिरत नाही, असे त्यांनी सांगितले.पाटणला गेल्यावेळी उदयनराजेंना कमी मते असली तरी त्यावेळची राजकीय परिस्थिती वेगळी होती. पाटणची विधानसभा होती, शिवाय उमेदवार पाटणचा होता. त्यामुळे थोडासा परिणाम होणारच. त्यावेळी झालेल्या चुका या खेपेस आम्ही दुरुस्त केल्या असल्याचे देसाई यांनी सांगितले.जयंत पाटील यांचा दावा काढला खोडूनकेळघर आणि लिंब येथील सभेत जयंत पाटील यांनी उदयनराजे हे राज्यसभेचे खासदार आहेत. त्यामुळे शशिकांत शिंदे यांना निवडून दिले तर जिल्ह्याला दोन खासदार मिळतील, अशी मार्मिक टिपण्णी केली होती. याबाबत छेडले असता शंभुराज देसाई म्हणाले, तोच निकष कोरेगावलाही लागू होतो. विधान परिषदेत आमदार असल्यामुळे कोरेगावात दोन आमदार आहेत. त्यामुळे कोरेगावला एक आमदार गमवावा लागू शकतो.
पंतप्रधान मोदी यांची २९ एप्रिलला कऱ्हाडमध्ये सभा, पालकमंत्री शंभुराज देसाईंनी दिली माहिती
By दीपक शिंदे | Published: April 24, 2024 5:02 PM