वाई : ‘पंतप्रधान आवास योजनेतून कोंढावळे-देवरुखवाडीतील ग्रामस्थांचे शंभर टक्के पुनर्वसन करण्यात येईल,’ अशी ग्वाही केंद्रीय समाजकल्याण व न्यायमंत्री रामदास आठवले यांनी दिली.
देवरुखवाडी व जांभळीतील अपघातग्रस्त लोकांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी रिपाइंचे जिल्हाध्यक्ष अशोकराव गायकवाड, तहसीलदार रणजित भोसले, उपविभागीय पोलीस अधिकारी शीतल जानवे-खराडे, उपविभागीय बांधकाम अभियंता श्रीपाद जाधव, संजय शिंदे, तालुका वैद्यकीय अधिकारी, डॉ. संदीप यादव, डॉ. तात्यासाहेब जगताप, स्वप्नील गायकवाड, बाजीगर इनामदार उपस्थित होते.
रामदास आठवले म्हणाले, ‘सातारा, रत्नागिरी, रायगड व पुण्याच्या काही भागाला अतिवृष्टीचा फटका बसला आहे. यामध्ये तेथीलही अपघातग्रस्त कुटुंबीयांचे पुनर्वसन करण्यासाठी केंद्राकडून सर्वतोपरी सहकार्य करणार आहे. राज्य शासनाने तज्ज्ञ समितीची स्थापना करून सध्या भूस्खलनमध्ये नुकसान झालेल्या कुटुंबीयांतील मृतांच्या वारसांना केंद्र शासनाकडून २ लाख व राज्य शासनाकडून ५ लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. राज्य शासनाने मंजूर केलेली मदत प्रशासनाने त्वरित द्यावी, तसेच जांभळी, जोर खोऱ्यातील अतिवृष्टीमुळे भातशेती, घरे, बंधारे, ओढ्यावरील वाहून गेलेल्या पुलांचे प्रस्ताव प्रशासनाने पंचनामे करून राज्य शासनाकडे पाठवावेत, त्या प्रस्तावांच्या मंजुरीसाठी केंद्राकडे पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन दिले.
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी शाळेत जाऊन पिडितांची विचारपूस करून देवरुखवाडीतील भूस्खलन भागाची व जांभळीतील वाहून गेलेल्या भातशेती व पुलाची पहाणी केली. यावेळी जांभळी खोऱ्यातील नागरिकांनी शंभर टक्के पुनर्वसन करण्याची मागणी केली, तर तशा आशयाचे निवेदन ग्रामस्थांनी दिले.
फोटो २७वाई-रामदास आठवले
वाई तालुक्यातील देवरुखवाडीतील नुकसानीची केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी पाहणी केली. (छाया : पांडुरंग भिलारे)