सातारा : सातारा तालुक्यातील एका शाळेत शिकणाºया विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी मुख्याध्यापकाला पाच वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा व दहा हजार रुपये दंड सुनावण्यात आला. संजय प्रतपाराव जाधव (वय ५०, रा. नांदगाव, ता. सातारा, सध्या रा. सातारा) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या मुख्याध्यापकाचे नाव आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, सातारा तालुक्यातील एका शाळेत संजय जाधव हा मुख्याध्यापक म्हणून काम करत होता. ९ आॅक्टोंबर २०१६ रोजी शाळेच्या आवारातील संगणक खोलीत विद्यार्थ्यांचा तास सुरू होता. दरम्यान वर्गात अचानक लाईट गेल्यामुळे वर्गात अधंरात पडला. त्यामुळे शिक्षकांनी खिडकीचा दरवाजा उघडण्यास सांगितल्याने पीडित मुलगी वर्गाच्या बाहेर व्हरांड्यात गेली. त्यावेळी जाधव याने त्या विद्यार्थिनीसोबत गैरवर्तणूक केले.
संबंधित पीडित मुलीने घरी गेल्यानंतर हा प्रकार वडिलांना सांगितला. त्यानंतर १० आॅक्टोंबर २०१६ रोजी बोरगाव पोलीस ठाण्यात मुख्याध्यापक जाधवच्या विरोधात पीडित मुलीच्या वडिलांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला.
आरोपीला अटक केल्यानंतर तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक एन. आर. चौखंडे यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपत्र दाखल केले. सुनावणीदरम्यान न्यायालयापुढे आलेले पुरावे आणि साक्षीदार ग्राह्य मानून अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश एन.एल. मोरे यांनी मुख्याध्यापक संजय जाधव याला पाच वर्षे सक्तमजुरीची शिक्षा व दहा हजार रुपये दंड तसेच दंड न दिल्यास तीन महिने साधी कैद, अशी शिक्षा सुनावली.
सरकार पक्षातर्फे सरकारी वकील एन.डी. मुके यांनी काम पाहिले. पोलीस प्रॉसिक्यूशन स्कॉडच्या महिला पोलीस सुनिता देखणे यांनी त्यांना सहकार्य केले.