सातारा : राज्य उत्पादन शुल्क विभागाने फलटण तालुक्यात विविध चार ठिकाणी सुरु असलेल्या बेकायदा बनावट देशी-विदेशी दारू निर्मिती कारखान्यावर छापा टाकून चौघाजणांना अटक केली. त्यांच्याकडून अलिशान कारसह एकूण २ लाख ४ हजार १७८ किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.पाच आरोपींपैकी रज्जाक हिराबाई सय्यद (रा. मलवडी, ता. फलटण) हा फरार असून एकूण पाच जणांविरुध्द महाराष्ट्र दारुबंदी कायद्यांतर्गत गुन्हा नोंद दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक स्नेहलता श्रीकर यांनी दिली.आसीफ रज्जाक सय्यद (रा. मलवडी, ता. फलटण) याच्या ताब्यातून बनावट दारु निर्मितीसाठी लागणारे स्पिरीट, रिकाम्या देशी दारु, सखू संत्राच्या व विदेशी दारू विविध कंपनीच्या बाटल्या, बुचे, इसेन्स, बुचे सील करण्यासाठी वापरण्यात येणारे एक हातमशीन, बनावट विदेशी दारु साठा तसेच एक अलिशान चारचाकी जप्त करण्यात आली.
वाखरी, ता. फलटण येथून संशयित आरोपी बाबा मारुती जाधव याच्या ताब्यातून बनावट देशी दारु सखू संत्राचा ३ हजार ६४० किंमतीचा साठा जप्त करण्यात आला. विकास ईश्वर काकडे (रा. बिबी, ता. फलटण) याच्या ताब्यातून बनावट देशी दारू सखू संत्राचा १ हजार ३५२ रुपयांचा तर राहुल श्रीकांत सरगर (रा.पवार गल्ली महतपुरा पेठ, मलटण, ता. फलटण) याच्या ताब्यातून विदेशी दारुचा ३ हजार १७० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.या कारवाईमध्ये विभागीय उपायुक्त वाय. एम. पवार, राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक संजय शिलेवंत, एस. व्ही. खराडे, बी.व्ही. ढवळे, नितीन शिंदे, महेश गायकवाड, सचिन खाडे, महेश मोहिते, राजेंद्र आवघडे, अजित रसाळ, अरुण जाधव, सागर साबळे यांनी भाग घेतला.