कोरेगाव/ वाठार स्टेशन : पुणे-मिरज रेल्वे मार्गावर पळशी ते वाठार स्टेशनदरम्यान थंडी आणि उन्हामुळे रुळाला तडा गेल्याचे बकरी चारण्यास आलेल्या पिंंपोडे खुर्द येथील युवकाच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्याने क्षणाचाही विलंब न लावता धावत रेल्वे थांबविण्याचा प्रयत्न केला. चालकाने देखील प्रसंगावधान राखत आपत्कालीन ब्रेकचा वापर केला आणि गाडी थांबविली.
रेल्वे प्रशासनाला या प्रकाराची माहिती समजताच तातडीने घटनास्थळी धाव घेतली. रुळाला तडे गेल्याने कोयना एक्सप्रेस तब्बल ७० मिनिटे एकाच जागी थांबून ठेवण्यात आली तर पुणे-कोल्हापूर पॅसेंजर वाठार स्टेशन स्थानकात थांबविण्यात आली. या मार्गावरील रेल्वे वाहतूक काहीकाळ पूर्णपणे विस्कळीत झाली होती.पिंपोडे खुर्द येथील दत्तात्रय लहू कदम हे आपल्या वडिलांसह बकरी पालनाचा व्यवसाय करतात.शनिवारी दुपारी पळशी प्राथमिक आरोग्य केंद्रानजीक देऊरकडे जाणाऱ्या जुन्या रस्त्यावर रेल्वे रुळानजीक ३० बकऱ्यांना चारण्यासाठी ते घेऊन आले होते. त्यांच्यासमवेत चुलत बंधू शिवाजी श्रीरंग कदम हे होते. शिवाजी यांना रेल्वे रुळाला तडा गेल्याचे दिसले. त्यांनी बंधू दत्तात्रय यांना ते दाखविले. तोपर्यंत कोयना एक्सप्रेस येत असल्याचा आवाज दूरवरून ऐकू येत होता.
दत्तात्रय यांच्या अंगावर नेमकी लाल रंगाची शाल असल्याने त्यांनी एक्सप्रेस थांबविण्याचा निर्णय घेतला आणि ते रेल्वेच्या दिशेने शाल फडकवत रुळाच्या मधोमध पळत सुटले. या परिसरात रेल्वे मार्ग सरळ नसून वळणावळणाचा असल्याने एक्सप्रेस चालकाला ही माहिती लवकर समजणार नाही, हे लक्षात घेऊन सुमारे दीड किलोमीटर अंतर शाल फडकवत कदम हे पळत येत होते. एका वळणावर एक्सप्रेस समोरून आली. तेवढ्यात कदम हे रुळावरून बाजूला झाले. मात्र चालकाच्या दिशेला त्यांनी ‘रूळ तुटलाय.... रूळ तुटलाय’ म्हणून जोरजोरात ओरडून सांगितले. काही तरी मोठी गडबड आहे. हे रेल्वे चालकाच्या लक्षात आले. त्यानंतर चालकाने क्षणाचाही विलंब न करता तत्काळ ब्रेक लावले. त्यामुळे एक्सप्रेस पुढे जाऊन थांबली.
कदम यांनी धावतच चालकाला पुढे रूळ तुटला असल्याचे सांगितले. त्यानंतर चालकाने बिनतारी संदेश यंत्रणेवरून पळशी आणि वाठार स्टेशन रेल्वे स्थानकावरील स्टेशन मास्तरांना ही माहिती दिली. त्यादरम्यान पुण्याहून कोल्हापूरला जाणारी पॅसेंजर वाठार स्टेशन स्थानकात येणार होती. ती तेथेच थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला. रेल्वे रूळ विभागाचे अभियंते आणि कर्मचारी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन रेल्वे रुळाची डागडुजीला सुरुवात केली. तत्पूर्वी अत्यंत संथ गतीने कोयना एक्सप्रेस आणि पॅसेंजर पुढे नेण्यात आली. त्यानंतर रेल्वे रुळाची दुरुस्ती करण्यात आल्यामुळे प्रवाशांनी सुटकेचा निश्वास टाकला.रेल्वे अधिकाºयांकडूनही कौतुकदत्तात्रय कदम व बंधू शिवाजी कदम यांनी प्रसंगावधान राखत रेल्वेचा अपघात टाळला. कोयना एक्सप्रेस थांबल्यानंतर प्रत्येक जण त्यांच्याकडे चौकशी करत होते. काही प्रवासी रूळ तुटलेल्या ठिकाणी चालत पोहोचले. रेल्वेचे अभियंते आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि रूळ दुरुस्तीचे काम सुरू झाले. रेल्वे मार्ग सुरू झाल्यानंतर अनेक अधिकाºयांकडून दत्तात्रय यांचे कौतुक करण्यात आले.प्रवासी पाया पडू लागलेदत्तात्रय कदम यांनी धावत जाऊन रेल्वे थांबविल्यामुळे मोठा अनर्थ टळला. या प्रकाराची माहिती ज्यावेळी रेल्वेतील प्रवाशांना समजली. त्यावेळी अनेकांनी कदम यांना धन्यवाद दिलेच; शिवाय काहीजण तर त्यांच्या पाया पडू लागले.
आम्ही बकरी चरण्यासाठी गेलो असता, रेल्वे रूळ तुटल्याचेदिसले. मग नंतर ही माहिती मी माझ्या भावाला दिली.-दत्तात्रय कदम