सातारा : पायाभूत सुविधांबरोबरच तरुणांच्या आशा-आकांक्षांना बळ दिले जाईल. जिल्ह्यात भारतीय प्रशासकीय सेवा, भारतीय पोलीस सेवा आदी नागरी सेवांच्या प्रवेशासाठी प्रशिक्षण देणारी संस्था सुरु व्हावी म्हणून युवकांमधून मागणी आहे. त्या दृष्टीनेही प्रयत्न केले जातील. तसेच महिला, महाविद्यालयीन युवतींच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यात येणार असून बाजारपेठा, महाविद्यालये व गर्दीची ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येतील. अशी ग्वाही पालकमंत्री विजय शिवतारे यांनी दिली.येथील छत्रपती शाहू क्रीडा संकुलात प्रजासत्ताक दिनानिमित्त पालकमंत्री शिवतारे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष माणिकराव सोनवलकर खासदार उदयनराजे भोसले, आमदार शंभूराज देसाई, आनंदराव पाटील, जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल, मुख्य कार्यकारी अधिकारी जी. श्रीकांत, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते. ध्वजवंदनानंतर परेड कमांडर पोलीस उपअधीक्षक नितीन जाधव यांच्या नेतृत्वाखालील पथकाने त्यांना मानवंदना दिली. त्यानंतर त्यांनी पोलीस व्हॅनमधून विविध पथकांचे निरीक्षण केले. पालकमंत्री म्हणाले, शेती आणि शेतकऱ्याला बळ देण्याबरोबरच सिंंचन व रस्ते विकासासारख्या पायाभूत सुविधांच्या निर्मितीवर भर देऊन जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येईल. आजही बहुतांश जणांच्या जगण्याचे साधन शेतीच आहे. माण, खटाव तालुका आणि फलटण व कोरेगाव तालुक्याच्या काही भागात अद्यापही दरवर्षी दुष्काळी परिस्थिती ओढवते. राज्यातील कोरडवाहू शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने जलयुक्त शिवार अभियान हा जलसंधारणाचा महत्वकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे.जलसंधारणाच्या कामाला विशेष प्राधान्य देण्यात येणार असून जिल्हा नियोजन समितीतून नाविन्यपूर्ण योजनेंतर्गत तसेच राज्य योजनेतून 0 ते १०० हेक्टरचे १९७२-८० च्या दुष्काळातील पाझर तलाव, वळण बंधारे आदींच्या दुरुस्तीसाठी भरीव तरतूद करण्यात येणार आहे. ते म्हणाले, उरमोडी, वांग आदी सिंचन प्रकल्पांना गतीने चालना देण्यात येईल. माण, खटावच्या दुष्काळी भागासाठी वरदान ठरणारी जिहे-कटापूर उपसा सिंचन योजना येत्या दोन वर्षात पूर्ण करुन नेर तलावामध्ये पाणी सोडण्यात येईल. यावेळी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य केलेल्या मान्यवरांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. कार्यक्रमास नगराध्यक्ष सचिन सारस यांच्यासह नगरसेवक, अपर जिल्हाधिकारी प्रमोद यादव, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तानाजी कोहिनकर, निवासी उपजिल्हाधिकारी संजीव देशमुख यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी, अधिकारीे उपस्थित होते. (प्रतिनिधी)आकर्षक संचलन परेड संचलनात पोलीस, गृहरक्षक दल, पोलीस बॅण्ड पथक, एनसीसी, एमसीसी, हॉर्स स्कॉड, आरएसपी, पोलीस बॅँड, विविध शाळातील विद्यार्थ्यांच्या पथकांचा समावेश होता. प्राथमिक शिक्षण विभाग, उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडील मुली वाचवा अभियानाचा चित्ररथ, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान आदी उत्कृष्ट चित्ररथांचे संचलन करुन योजनांची जनजागृती कली. ८० मेगावॉट विद्युत प्रकल्पाचे काम लवकरच जिल्ह्यातील महत्वाचा असलेल्या कोयना धरणाच्या पायथ्याशी गेल्या काही वर्षापासून रखडलेल्या ८० मेगावॉटच्या विद्युत प्रकल्पाचे काम येत्या दोन वर्षात पूर्ण करण्यात येईल. जिल्ह्याच्या आरोग्य सेवेतील महत्वपूर्ण असलेल्या ५०० खाटांचे रुग्णालय आणि शासकीय महाविद्यालयासाठी जलसंपदा विभागाची कृष्णानगर येथील जागा देण्याबाबत लवकर कार्यवाही करण्यात येईल, असेही यावेळी पालकमंत्री म्हणाले.
महाविद्यालयीन युवतींच्या सुरक्षेला प्राधान्य
By admin | Published: January 27, 2015 9:25 PM