मलकापूर : शिक्षण क्षेत्रामध्ये विनाअनुदानित शाळांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. त्याचबरोबर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचेही विविध प्रश्न आहेत. या सर्व अडचणी सोडविण्यासाठी प्राधान्य दिले जाईल. शिक्षण क्षेत्रातील प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे आश्वासन आमदार जयंत आसगावकर यांनी दिले.
मलकापूर येथे लक्ष्मीदेवी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित नूतन मराठी प्राथमिक शाळेला दिलेल्या सदिच्छा भेटीप्रसंगी ते बोलत होते. संस्थेचे सचिव व मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांनी त्यांचे स्वागत केले. संस्थेचे संचालक वसंतराव शिंदे, आनंदराव सुतार, मोहनराव शिंगाडे, महेंद्र भोसले, मुख्याध्यापक आनंदा पाटील यावेळी उपस्थित होते.
आमदार जयंत आसगावकर म्हणाले, प्रतिकुल परिस्थितीमध्ये दिवंगत स्वातंत्र्यसैनिक भास्करराव शिंदे यांनी आगाशिवनगरमध्ये या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शिक्षणाची ज्योत उभारली. विद्यार्थ्यांना शिक्षणाची सोय उपलब्ध करुन दिली. या संस्थेची उभारणी करण्यामागे त्यांची दूरदृष्टी दिसून येते.
संस्थेचे सचिव मनोहर शिंदे यांनी विनाअनुदानित शाळा, शिक्षकांच्या प्रश्नांबाबतच्या व्यथा शिक्षक आमदार आसगावकर यांच्याकडे मांडल्या. यावेळी आमदार आसगावकर यांनी माजी आमदार भास्करराव शिंदे यांच्या प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन केले.
प्रेमांकी देसाई व मानसी बारसिंग यांनी सूत्रसंचालन केले तर मुख्याध्यापक आनंदा पाटील यांनी आभार मानले.
फोटो : ११केआरडी०१
कॅप्शन : मलकापूर येथील नूतन मराठी शाळेला आमदार जयंत आसगावकर यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी मनोहर शिंदे, वसंतराव शिंदे, आनंदराव सुतार उपस्थित होते.