माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना ई मेलद्वारे धमकी, कऱ्हाडातील निवासस्थानी पोलीस बंदोबस्त वाढवला
By संजय पाटील | Published: July 30, 2023 03:49 PM2023-07-30T15:49:21+5:302023-07-30T15:49:59+5:30
Prithviraj Chavan: माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांना अज्ञाताकडून ई मेलद्वारे धमकी देण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकाराने राज्यात खळबळ उडाली आहे.
- संजय पाटील
कऱ्हाड - माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांना अज्ञाताकडून ई मेलद्वारे धमकी देण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकाराने राज्यात खळबळ उडाली असून माजी मुख्यमंत्री चव्हाण यांच्या कऱ्हाडातील पाटण कॉलनीतील निवासस्थानी कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच त्यांच्या वैयक्तिक सुरक्षा व्यवस्थेतही वाढ करण्यात आली आहे.
दरम्यान, ईमेलद्वारे धमकी देणाºया अज्ञातावर कराड शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी नांदेडमधून एकाला ताब्यात घेतल्याचे समजते. मात्र, अद्याप पोलिसांनी त्याला दुजोरा दिलेला नाही.
शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांचा एक व्हिडीओ दोन दिवसांपुर्वी समोर आला. त्यामध्ये त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्याचे दिसून आल्यानंतर त्या वक्तव्याचे सर्वत्र पडसाद उमटले. संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी यांच्याविषयी चुकीचे विधान केल्याचे त्या व्हिडीओमध्ये दिसत आहे. त्यानंतर विधानसभेच्या अधिवेशानात संभाजी भिडे यांच्यावर कारवाईची व अटकेची मागणी माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केली होती. या मागणीवेळी माजी मुख्यमंत्री चव्हाण हे आक्रमक झाले होते. तसेच त्यानंतर राज्यभर काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आंदोलन करुन संभाजी भिडे यांच्यावर कारवाईची मागणी केली.
दरम्यान, संभाजी भिडे यांच्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी आक्रमक भुमिका घेतलेली असतानाच त्यांना ई मेलद्वारे अज्ञाताकडून धमकी देण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आमदार चव्हाण यांना अज्ञाताने ई मेल पाठवून ही धमकी दिली आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर क-हाडात पाटण कॉलनीमध्ये असलेल्या आमदार चव्हाण यांच्या निवासस्थानी कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.