माढ्याचा पुढील खासदार काँग्रेसचा; राष्ट्रवादीच्या जागेवर पृथ्वीराज चव्हाणांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2023 03:05 PM2023-08-15T15:05:42+5:302023-08-15T15:15:28+5:30

माढा लोकसभा मतदारसंघातील माण, खटाव व फलटण विधानसभा मतदारसंघनिहाय प्रमुख काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक दहिवडी येथील सिद्धनाथ मंगल कार्यालयात झाली.

Prithviraj Chavan's claim for Madha's next MP is Congress, NCP's seat | माढ्याचा पुढील खासदार काँग्रेसचा; राष्ट्रवादीच्या जागेवर पृथ्वीराज चव्हाणांचा दावा

माढ्याचा पुढील खासदार काँग्रेसचा; राष्ट्रवादीच्या जागेवर पृथ्वीराज चव्हाणांचा दावा

googlenewsNext

सातारा- आगामी लोकसभा निवडणुकांच्या तयारीला आता सर्वच पक्ष लागले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वात भाजपने तयारी सुरू केली असून मोदींचे आजचे भाषणही त्याच अनुषंगाने देशातील नागरिकांना उद्देशून करण्यात आल्याचे पाहायला मिळाले. महाराष्ट्रातून महायुतीच्या नेतृत्त्वात ४५ जागा निवडून आणण्याचं भाजपाचं लक्ष्य आहे. तर, काँग्रेससह महाविकास आघाडीने जोरदार तयारी सुरू केली आहे. काँग्रेस निरीक्षक आणि वरिष्ठ नेते यासाठी दौरे करत आहेत. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी माढा लोकसभा मतदारसंघाचा दौरा केला. त्यावेळी, येथील पुढील खासदार काँग्रेसचाच असेल असा दावाही त्यांनी केला आहे. 

माढा लोकसभा मतदारसंघातील माण, खटाव व फलटण विधानसभा मतदारसंघनिहाय प्रमुख काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक दहिवडी येथील सिद्धनाथ मंगल कार्यालयात झाली. त्यावेळी बोलताना त्यांनी कार्यकर्त्यांना लोकसभेच्या तयारीला लागा, असे सूचवले. विशेष म्हणजे येथील पुढील खासदार काँग्रेसचाच असेल, असे म्हणत त्यांनी राष्ट्रवादीच्या जागेवर दावा केल्याचं दिसून येतंय. भाजप खासदार निवडून आपण नुकसान करून घेतल्याची जाणीव इथल्या मतदारांना झाली आहे. तर, मोदी सरकारमुळे देश आर्थिक संकटाकडे वाटचाल करतोय. शेतकऱ्यांना मदत करण्याऐवजी राज्य सरकार बदल्यांमध्ये भ्रष्टाचार करत आहे. एकनाथ शिंदे हे फक्त नावापुरतेच मुख्यमंत्री आहेत, असा टोलाही पृथ्वीराज चव्हाण यांनी लगावला. दरम्यान, या मतदारसंघात स्वतंत्रपणे निवडणूक लढल्यास खासदार काँग्रेसचाच होईल, असे काँग्रेस जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील यांनी म्हटले. 

दरम्यान, २००९ मध्ये माढा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी निवडणूक लढवली होती. त्यावेळी, राष्ट्रवादीने ही जागा जिंकली होती. तर, २०१४ मध्ये विजयसिंह मोहिते पाटील या जागेवरुन खासदार बनले होते. त्यांनी सदाभाऊ खोत यांचा पराभव  केला होता. त्यानंतर, २०१९ मध्ये या जागेवर रणजीतसिंह नाईक निंबाळकर आणि राष्ट्रवादीच्या संजय शिंदेंमध्ये लढत झाली. त्यात, रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांचा विजय झाला होता. त्यामुळे, येथील जागा जागावाटपात राष्ट्रवादीकडे असते. मात्र, आता काँग्रेसने थेट या जागेवर दावा केला आहे. त्यामुळे, महाविकास आघाडीत नेमकं कोण ही जागा लढणार हे पाहावे लागेल. 

भाजपमध्येही दोन गट

माढा लोकसभा मतदारसंघात पुढील खासदार कोण, यावरून याच पक्षाचे विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर आणि आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या समर्थकांमध्ये समाज माध्यमांतून जोरदार संघर्ष युद्ध पेटले आहे. यात निंबाळकर आणि मोहिते-पाटील यांच्या राजकीय विरोधकांनी शत्रूचा शत्रू तो आपला मित्र या न्यायाने सक्रिय भूमिका घ्यायला सुरुवात केल्यामुळे माढा लोकसभा मतदारसंघात भाजपअंतर्गत गटबाजीला जोर चढल्याचे दिसून येते.

Web Title: Prithviraj Chavan's claim for Madha's next MP is Congress, NCP's seat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.