कऱ्हाड: गेल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती, राहती घरे यासह जनजीवनावर अपरिमित नुकसान ओढवले आहे. नुकसानग्रस्त लोकांच्या पाठीशी राज्य शासन ठाम आहे. प्रशासनाने लोकांना अधिकाधिक मदत पोहचवावी, असे सांगून कऱ्हाड दक्षिण मतदारसंघातील दक्षिण मांड नदीच्या पुरामध्ये नुकसान झालेल्या बाधितांना भरपाई देण्यास अग्रक्रम ठेवावा. नदीवरील काले नांदगाव, टाळगावच्या पुलांच्या आवश्यक दुरुस्त्या करण्याच्या सूचना आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. पुलांच्या दुरुस्तीसाठी निधी मिळवण्यासाठी प्राधान्यक्रम ठेवा, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी गुरुवारी कराड दक्षिण पूरग्रस्त भागात दौरा केला. यावेळी प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार अमरदीप वाकडे, गटविकास अधिकारी डॉ. आबासाहेब पवार, कराड दक्षिण काँग्रेसचे अध्यक्ष मनोहर शिंदे, जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस पैलवान नाना पाटील, प्रा. धनाजी काटकर, इंद्रजित चव्हाण, युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष शिवराज मोरे, नरेंद्र नांगरे-पाटील, नितीन थोरात, जिल्हा परिषद सदस्य शंकरराव खबाले, उदय पाटील, पैलवान तानाजी चवरे, देवदास माने यांच्यासह पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती.
नांदगाव, काले येथील मांड नदीवरील पुलाची पाहणी केली सुरुवातीला आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. उंडाळे येथील जिंती रोडवरील पूल व तुळसण फाट्यावरील पुलाचीही पाहणी केली. जिंती रोडवरील पुलाचा भराव व जवळच्या बंधाऱ्याच्या सांडवा, टाळगाव येथील गावाजवळच्या पुलाची व खचलेल्या भरावाची पाहणी केली. सवादे, बांदेकरवाडी येथील साकव पुलाचा पडलेला भराव व तेथील नुकसानीची पाहणी केली.
२९नांदगाव
नांदगाव, ता. कऱ्हाड येथे दक्षिण मांड नदीवरील पुलाची पाहणी करताना आमदार पृथ्वीराज चव्हाण, समवेत अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.