सातारा : यंदाच्या महाराष्ट्र केसरीचा किताब कोल्हापूरच्या पृथ्वीराज पाटीलनं पटकावला. पृथ्वीराज पाटील याने मुंबईच्या विशाल बनकरला चितपट करत या किताबावर आपलं नाव कोरलं. अन् महाराष्ट्राला नवा महाराष्ट्र केसरी मिळाला. पृथ्वीराजच्या या विजयामुळे कोल्हापूरकरांचे बऱ्याच वर्षाचं स्वप्न पुर्ण झालं.महाराष्ट्र केसरीच्या अंतिम सामन्यात कोल्हापूरचा पृथ्वीराज पाटील विरूद्ध मुंबई पूर्वचा मल्ल विशाल बनकर यांच्यात लढत झाली. अटीतटीच्या लढतीत पृथ्वीराजनं अखेरच्या 45 सेकंदात विशाल वर डाव टाकत ही किताब पटकावला. त्याने 5-4 अशा फरकाने सामना जिंकत महाराष्ट्र केसरीवर आपलं नाव कोरलं.
पहिल्या फेरीत विशालने 4-0 अशी आघाडी घेतली होती. मात्र पृथ्वीराजने आक्रमक डाव टाकत ही आघाडी मोडत विशाल चितपट करुन विजयी मिळवला. माती व गादी गटाच्या अंतिम सामने रंगतदार झाले. राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने सातारा जिल्हा तालीम संघ आयोजित 64 वी राज्य अजिंक्यपद आणि महाराष्ट्र केसरी स्पर्धा साताऱ्यातील जिल्हा क्रीडा संकुलात पार पडली. अंतिम लढतीची कुस्ती सुरु झाल्यापासून चुरशीची बनली होती.
पृथ्वीराज मूळचा पन्हाळा तालुक्यामधील देवठाणेचापृथ्वीराज पाटील हा मूळचा कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यामधील देवठाणेचा आहे. त्याने संजीवनीदेवी गायकवाड महाविद्यालयातून बारावीपर्यंत शिक्षण, मोतीबाग तालमीतून कुस्तीचा श्रीगणेशा केला. त्याने वस्ताद महान भारत केसरी दादू चौगुले, पैलवान संग्राम पाटील व धनाजी पाटील यांच्याकडून कुस्तीचे धडे गिरवले. पृथ्वीराज पाटील आर्मीत हवालदार पदावर कार्यरत आहे.